फुलंब्री तालुक्यात शंभराहून अधिक सहकारी संस्था आजच्या घडीला निवडणुकीस पात्र आहेत, तर येत्या दोन महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपणार आहे. अशा परिस्थितीमध्ये ऑगस्टपर्यंत निवडणुका लांबविल्या, तर बाजार समितीचीही निवडणूक पुढे ढकलली जाणार आहे. शासनाने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या. या निवडणुकीत फारसे कोरोनाचे नियम पाळले गेले नाहीत, अशा परिस्थितीमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबविण्यात आल्या आहेत. मोजके मतदान असूनही या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबविण्यात आल्या, त्यांच्या संचालक मंडळांना मुदतवाढ देण्यात आली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप तालुकाध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी व्यक्त केली.
चौकट
मुदतवाढ संपलेल्या तालुक्यातील सहकारी संस्था...
फुलंब्री तालुक्यातील एकूण १०२ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. यात विविध कार्यकारी संस्था (सोसायट्या) ४३ आहेत, तर मजूर संस्था- २३, सुशिक्षित बेरोजगार संस्था- २८, औद्योगिक संस्था- २, खरेदी-विक्री संघ- १, नागरी पतसंस्था - ४ तसेच एका शिक्षक पतसंस्थेचा समावेश आहे. येत्या दोन महिन्यात आणखी सोसायट्या व बाजार समितीचा कालावधी संपत आहे.