जालना : शहरातील कुंडलिका व सीना या दोन्ही नद्यांची स्वच्छता मोहीम नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गतवर्षी दुष्काळामुळे शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल झाले होते. मात्र जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र शहरातून दोन नद्या वाहत असताना त्याचा उपयोग शहरवासियांना होत नसल्याची ओरड नागरिकांमधून सुरू झाली. उलट नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा असून नदीपात्रामध्ये अतिक्रमणे होत आहे. परिणामी नदीपात्र अरूंद झाले आहे. भविष्यात या नद्यांचा उपयोग शहरवासियांना व्हावा, यासाठी घाणेवाडी जलसंरक्षण मंच तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नगरपालिकेच्या मार्फत नद्या स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती रविवारी आ. कैलास गोरंट्याल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने आगामी काळात लवकरच याबाबत प्रस्ताव तयार करून मोहीम हाती घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
शहरातील नद्यांची स्वच्छता मोहीम राबविणार
By admin | Updated: May 26, 2014 00:27 IST