राजकुमार जोंधळे , लातूरशहरासह जिल्ह्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. नदी-नाले कोरडी पडली असून, विंधनविहिरींची पाणीपातळीही खालावली आहे. परिणामी कांही विंधनविहिरींचे पाणीच गायब झाले आहे. अशा भयावह दुष्काळात मात्र टॅँकर लॉबी मालामाल होत आहे़ शहरात तब्बल ७०० छोट्या-मोठ्या पाण्याचे टँकर पाण्याचा व्यवसाय करीत आहेत़ हा आकडा जिल्ह्यात ३ हजार ५०० च्या वर गेला आहे़ पाणीटंचाई इतकी भिषण होत चालली आहे की, सध्यस्थितीत ५ हजार लिटर्स पाण्याचे टँकर ५०० रुपयाला विकले जात आहे़ त्यातील पाणी पिण्यायोग्य असेल याची खात्री नाही़शहरात महिन्यातून दोन वेळा महापालिकेकडून पाणी पुरवठा होत असल्याने, नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरु आहेत. मांजरा धरणात मृत जलसाठा आहे. भविष्यातील पाणीटंचाईच्या झळांची चाहूल सुरु झाली आहे. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या संकटात मात्र जिल्हाभरातील टॅँकरलॉबी आता सक्रीय झाली आहे. या व्यवसायात येणाऱ्या वाहनधारकांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक वाहनधारकांना काम राहिले नाही. वाहनतळावर दिवसदिवस थांबून राहिले तरी भाडे मिळत नाही. यातून कांही टमटम, अॅपेधारकांनी आपल्या गाड्यातून पाणीविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. ज्याच्याकडे पाणी आहे, त्यांना पाण्याचे ठराविक पैसे द्यायचे आणि आपले टॅँकर, बॅरल भरुन घ्यायचे...मग मागेल त्यांना याचा पुरवठा करायचा, असा हा नगदी पैसे देणारा व्यवसाय असल्याने अनेक वाहनधारकांनी यात दुष्काळातही उड्या घेतल्या आहेत. मोठे टॅँकर हे किमान ६ हजार ते १२ हजार लिटरचे असल्यामुळे या टॅँकरला घरगुत्ती ग्राहक मिळत नाही. मोठ्या टॅँकरला हॉटेल, हॉस्टेल, कार्यालय, मंगलकार्यालय, विविध कार्यक्रम आदींकडून मागणी असते. तर १ ते ५ हजार लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरला मात्र कौटुंबिक ग्राहक मिळतो. छोट्या टॅँकरवाल्याकडून २५० ते ३०० रुपये आकारले जाते. विशेष म्हणजे अंतर पाहून हे भाडे ठरविल जाते. सध्या जिल्हाभरात बेसुमार पाणीउपसा या व्यवसायाच्या नावाखाली रात्रंदिन सुरु आहे.
शहरात ७०० टँकर करतात पाण्याचा धंदा
By admin | Updated: December 28, 2015 00:20 IST