उस्मानाबाद : ग्रामीण भागातून ज्ञान निर्मितीची प्रक्रिया जोवर होत नाही. तोवर सशक्त भारत निर्माण होणार नाही. हे गांधी तत्वज्ञान आपल्या साहित्यातून अविष्कृत करणाऱ्या वामन कृष्णा चोरघडे यांची कथा खऱ्या अर्थाने मानवतावादाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक तथा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजन गवस यांनी केले.मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने गांधीवादी विचारसरणीचे लेखक वामन कृष्णा चोरघडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहरातील हॉटेल मेघमल्हार सभागृहात गुरुवारी वामन चोरघडे यांची कथा या विषयावर गवस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतीकराव ठाले-पाटील, कार्यवाहक कुंडलिक आतकरे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य किरण सगर, उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गवस म्हणाले की, पूर्वी लिखित परंपरा नव्हती. अक्षर वाङमय नव्हते. त्याकाळी तोंडी रचना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केली जायची.हे ज्ञानसंक्रमण म्हणजे खरे साहित्य.साहित्याचे हे मूलधन चोरघडे यांनी खेडोपाडी भ्रमंती करून एकत्रित केले. आधुनिक नवकथेला चोरघडे यांच्या या कामाचा मोठा लाभ झाला असल्याचेही डॉ. गवस यांनी नमूद केले. कथेला गांधी तत्वज्ञान बहाल करण्याचे मोठे काम चोरघडे यांनी केले. स्त्रीचा गुदमरलेला श्वास मोकळा करणाऱ्या अनेक कथा त्यांनी प्रभावीपणे वाचकांच्या हवाली केल्या आहेत. गांधी विचारावर निष्ठा असल्यामुळेच माणसाविषयी अतीव श्रद्धेने चोरघडे यांनी लिखाण केले असल्याचे गवस यांनी सांगितले.उस्मानाबादकरांनी साहित्य आणि साहित्यिकाना नेहमीच सन्मान दिला असल्याचे सांगून ठाले-पाटील यांनी उस्मानाबादला अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे. यासाठी प्रभावी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी उस्मानाबादकरांमध्ये निर्माण झालेली उर्मी उभ्या राज्याला ठाऊक झाली असल्याचे सांगून संमेलन उस्मानाबादला होणारच असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. कुंडलिक अतकरे यांनी उस्मानाबादमध्ये होत असलेल्या साहित्यिक उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक नितीन तावडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी केले. आभार राजेंद्र अत्रे यांनी मानले. प्रारंभी वामन चोरघडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास शहर व परिसरातील साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
चोरघडे यांची कथा मानवतावादाचा केंद्रबिंदू
By admin | Updated: August 2, 2014 01:40 IST