ताडबोरगाव : नवीन बांधकाम सुरु असलेल्या शौचालयाच्या टँकमध्ये पडून एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे घडली.समर्थ प्रभाकर पठाडे (४) असे या मयत बालकाचे नाव आहे. ताडबोरगाव गावात प्रभाकर पठाडे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरु आहे. आतील बाजूस शौचालयाचा टँक बांधला आहे. सायंकाळच्या सुमारास समर्थ हा खेळत असताना उघड्या असलेल्या टँकमध्ये त्याचा तोल गेला. घरातील महिला स्वयंपाक करीत असल्याने त्यांचे लक्ष तिकडे गेले नाही. बराच वेळ झाला समर्थ दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला असता तो शौचालयाच्या टँकमध्ये पाण्यावर तरंगताना दिसला. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या शौचालयाच्या टँकमधील पाण्याचा वापर बांधकामासाठी केला जात होता. त्यामुळे हा टँक उघडाच होता. अंधारामुळे उघडा टँक दिसला नाही व तो तोल जाऊन पडला असावा, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
सेफ्टी टँकमध्ये पडून बालकाचा मृत्यू
By admin | Updated: March 4, 2016 23:35 IST