चिकलठाण ते कन्नड या बारा कि.मी. रस्त्याची संपूर्णपणे वाट लागली आहे. यामुळे भोकनगाव, दाभाडी, बहिरगाव, कुंजखेडा, हिवरखेडा, वडाळी, नीमडोंगरी, ठाकूरवाडी, घुसूर तांडा या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याचे काम करावे म्हणून पंचक्रोशीतील नागरिकांनी तीन ते चार वेळेस कन्नड येथील पिशोर नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. मात्र, उपयोग झाला नाही. वास्तविक पाहता, वीस मिनिटांचे हे अंतर कापण्यासाठी खड्डे व उखडलेल्या गिट्टीमुळे वाहनधारकांना तब्बल एक तास लागतो. येथून सतत ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांना पाठीच्या मणक्यांचा व मानेचा त्रास सुरू झाला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झालेले आहे, तसेच पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचून सतत अपघात होत असतात. २०१८ मध्ये मंजूर झालेले काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने ठेकेदार व सा.बां. अधिकाऱ्यांचे संबंध यातून दिसून येतात.
चौकट
तीव्र आंदोलन छेडणार
तीन वर्षांपासून रखडलेल्या चिकलठाण ते कन्नड या रस्त्याचे काम करण्यासाठी अनेक वेळा नागरिकांनी निवेदने दिली आहेत. आंदोलनेही केली आहेत. ग्रामस्थ प्रशासन व लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. पाठपुरावा करूनही यश मिळत नसल्याने आता न्यायालयात दाद मागू, तसेच कन्नड येथे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा नानासाहेब चव्हाण, सुनील चव्हाण, सतीश चव्हाण, संजय विखणकर, बाळू गायकवाड, सोमनाथ मोरे, निखिल जाधव, उमेश खंडेलवाल, बाबासाहेब चव्हाण आदींनी दिला आहे.
फोटो : कन्नड ते चिकलठाण रस्त्याची झालेली दुरवस्था.
270621\20210625_185206.jpg
कन्नड ते चिकलठाण रस्त्याची झालेली दुरवस्था.