औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये १० महिन्यांत दीड लाखांहून अधिक स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून अलीकडे या लॅबमध्ये दरदिवशी १४००- १५०० स्वॅब तपासणीचे काम केले जात आहे. यासाठी संशोधक विद्यार्थी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
मागील वर्षी विशेषतः औरंगाबाद शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता. तेव्हा सुरुवातीचे काही दिवस कोरोना संसर्ग रुग्णांच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जायचे. त्यानंतर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) लॅबमध्ये त्याची तपासणी होऊ लागली. परंतु, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे घाटीच्या लॅबवर आजुबाजूच्या जिल्ह्यांचाही भार वाढला. त्यामुळे राज्यपाल, उच्चशिक्षण मंत्री, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार विद्यापीठाच्या ‘पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडींग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज’ या संशोधन केंद्रात ६ जुलै २०२० पासून कोरोना टेस्टींग लॅब कार्यान्वित करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी तसेच ‘ऑरिक’चे संजय काटकर यांनी सहकार्य केले. ऑरीक सिटीने सीएसआर फंडातून १ कोटी २३ लाख रुपयांचा निधी दिला. त्यातून ही लॅब उभारण्यात आली. या लॅबमध्ये दररोज एक हजारपर्यंत स्वॅब तपासणीचे उद्दिष्ट ठरविले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मान्यता दिलेल्या या लॅबसाठी रसायने आणि साहित्याचा पुरवठा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत केला जात आहे.
चौकट..............
ग्रामीण भागातील नमुन्यांची तपासणी
‘पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडींग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज’चे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी सांगितले की, सध्या या लॅबमध्ये ग्रामीण भागातील स्वॅबची तपासणी केली जात आहे. ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच काही उपकेंद्रे व ४ ग्रामीण रुग्णालयांमध्ये घेण्यात येत असलेले स्वॅब याठिकाणी तपासणीसाठी दिले जातात. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत प्राप्त नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल संबंधितांना ऑनलाईन पाठविला जातो. या लॅबमध्ये तसेच डाटा तयार करण्यासाठी विद्यापीठातील संशोधक व पदव्युत्तर विद्यार्थी काम करतात. त्यांना दरमहा १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते.