पाचोड : आजार कुठलाही असोत त्यावर प्रगती तंत्रज्ञानाच्या आधारे आज उपचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठलीच भिती न बाळगता लक्षणे आढळून आल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक क्षयरोग सहसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले. पाचोड ग्रामीण रुग्णालयात त्यांनी नुकतीच भेट देत क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोधमोहीम अभियानाबाबत आढावा घेतला. नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेस दिले. यासह खोकला, ताप, वजनात घट, मानेवर गाठी, संध्याकाळी येणारा ताप आदी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णास नमुने घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
डॉ. माने यांनी वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे कुष्ठरोग व क्षयरोग कार्यक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या मोहिमेचा आढावा घेतला. अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील क्षयरोग व कुष्टरोग मोहिमेअंतर्गत संशयित रुग्ण शोधून त्यांचे तातडीने निदान करून उपचार करण्याबद्दल सूचना दिल्या. या मोहिमेच्या काळात सर्वांनी कार्यक्षेत्रात जाऊन योग्य रीतीने सर्वेक्षण करत एकही संशयित रुग्ण सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. यावेळी कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. अभय धानोरकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. अविनाश बोरकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पोहरेंगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भुषण आगाज, क्षयरोग विभागाचे अधिकारी डॉ. सतीश गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल दवणे, डॉ. संदीपान काळे, डॉ. शिवाजी पवार, डॉ. शिवाजी भोजणे, डॉ. रोहित जैन, डॉ. साकीब सौदागर, डॉ. बाबासाहेब घुगे, बाळासाहेब बोचरे आदी उपस्थित होते.