लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळणारा राजेंद्र पोहाल याने तयार केलेल्या बोगस नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांची बोगस स्वाक्षरी करणा-या एका उच्चशिक्षित आरोपीला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.सुनील बन्सीलाल डोणगावकर ऊर्फ गजहास (४३,रा. भीमनगर,भावसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे शिक्षण एम.एस्सीपर्यंत झालेले आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार किशोर चंद्रभान देहाडे आणि त्याच्या बारा जणांना घाटीत कनिष्ठ लिपिक आणि शिपाईपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे २४ लाख रुपये उकळले. २०१४ मध्ये पैशाचा व्यवहार झाल्यानंतर आरोपीने दोन वर्षे त्यांना फिरवले. नंतर तक्रारदारांसह अन्य लोकांना त्याने बोगस नियुक्तीपत्रे दिली. यासोबत ५० लिपिक आणि ४८ शिपाई पदांची निवड यादी त्यांना दाखविली. ती नियुक्तीपत्र खरे असल्याचे भासविण्यासाठी आरोपीने त्यावर अधिष्ठातांच्या सह्या आणि शिक्का मारलेला होता. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पोहाल यास अटक केली.पोलीस कोठडीत त्याची चौकशी केली असता त्याने तक्रारदारांना दिलेल्या नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांच्या सह्या सुनील डोणगावकर याने मारल्याची कबुली दिली. त्याच्या जबाबानंतर पोलिसांनी २९ आॅक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी सुनीलला राहत्या घरातून अटक केली. तो उच्चशिक्षित असून त्याला नोकरी नाही. तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो.लक्ष्मीनगरातील डीटीपी सेंटरवर बनविले बोगस नियुक्तीपत्रेपोहाल हा नियमित लक्ष्मीनगरातील एका डीटीपी सेंटरवर ये-जा करीत. तेथे त्याची ओळख सुनीलसोबत झाली होती. तेथेच त्याने बोगस नियुक्तीपत्रे तयार केली. या नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांच्या सह्या करण्याचे काम त्याने आरोपी सुनील याच्याकडून करून घेतल्या. त्यासाठी त्याला पोहालने काही रक्कमही दिली.सुनीलने मात्र पोहाल त्याला एक मोबाइल हॅण्डसेट देणार होता, मोबाइलच्या आमिषाने सह्या केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती तपास अधिकारी पोहेकॉ अरुण वाघ यांनी सांगितले.
बोगस नियुक्तीपत्र: अधिष्ठातांच्या बनावट सह्या करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:02 IST