शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील घुग्गी - सांगवी तांड्यावर हातभट्ट्या पुन्हा जोमात सुरु झाल्या आहेत़ त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीपुढे हातभट्टी दारूचे आव्हान निर्माण झाले आहे़ शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घुग्गी- सांगवीच्या तांड्यावर अनेक वर्षापासून सुरू असलेली हातभट्टीची दारू बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती़ एवढेच नव्हे तर हातभट्टी बंद करण्यासाठी थेट उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली शिंदे यांना साकडे घालण्यात आले होते़ त्यामुळे शिरूर अंनतपाळ पोलिसांनी काही हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या़ त्यानंतर काही काळ या हातभट्ट्या बंद होत्या़ मात्र मागील काही दिवसांपासून या हातभट्ट्या पुन्हा सुरु झाल्या आहेत़ त्यामुळे तंट्याचे प्रमाण वाढत आहे़ त्याचबरोबर व्यसनींच्या संख्येत वाढ होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत़ या हातभट्ट्यांची दैैनंदिन उलाढाल २० ते २५ हजार रूपयांवर गेली असल्याचे घुग्गी-सांगवीचे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नामदेव हजारे यांनी सांगितले़ हातभट्टीच्या दारूमुळे महिलांना दिवसेंदिवस दारूड्यांच्या अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे महिलांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ पोलिसांनी लवकरात लवकर ही हातभट्टी बंद करावी अशी मागणी महिलांनी केल्याचे हजारे यांनी सांगितले़ (वार्ताहर)घुग्गी- सांगवी येथील अवैध हातभट्टीबाबत पोलिस निरीक्षक बी़पी़मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता हातभट्ट्यांचा तात्काळ कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़
तंटामुक्तीपुढे हातभट्टीचे आव्हान
By admin | Updated: July 26, 2014 00:39 IST