औरंगाबाद : मध्यवर्ती जकात नाक्याच्या जागेवर २५० खाटांचे हॉस्पिटल उभारण्यासाठी महापालिका मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाला १५० कोटींची गरज असून, केंद्र शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहरात राहणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिक ा केंद्र शासनाच्या नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत जकात नाक्यावर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाकडे यासंदर्भात प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे.एकीकडे शहरातील जुनी आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर मनपा भर देत असताना मध्यवर्ती जकात नाक्यावर १५० कोटी रुपये खर्च करून इमारत बांधण्याच्या प्रस्तावावरही भर देत आहे. माजी केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी मनपाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत हिरवी झेंडी दाखविली होती. आता नवीन सरकारकडून हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी मनपाने कंबर कसली आहे. या कामात राजकीय इच्छाशक्तीचीही मदत घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी नमूद केले. भविष्यात मनपाने मध्यवर्ती जकात नाक्यावर पीपीपी मॉडेलनुसार इमारत बांधल्यास ती चालविण्यासाठी कोणाला द्यावी, या दृष्टीने चाचपणी करण्यात आली. अपोलो हॉस्पिटल, वोक्हार्ट कंपनीसह शहरातील आणखी काही रुग्णालयांशी मनपा प्रशासनाने चर्चा केली. दोन कोटींचा निधी प्राप्तशहरात मनपातर्फे ठिकठिकाणी आरोग्य केंद्रे आणि छोटे दवाखाने चालविण्यात येतात. काही रुग्णालयांमध्ये डिलिव्हरीची सोयही आहे. शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यात मनपा अपयशी ठरत आहे. कारण मनपाकडे कोणतीच साधने उपलब्ध नाहीत.आरोग्य सेवा आणखी दर्जेदार बनविण्यासाठी केंद्राच्या एनयूएचएम योजनेचा लाभ घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या योजनेंतर्गत आतापर्यंत मनपाला दोन कोटींचा मुबलक निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी दिली.केंद्राच्या निधीतून चिकलठाणा आणि नेहरूनगर येथील आरोग्य केंद्रांवर ५० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे.दहा हजार लोकवस्तीला एक आरोग्य केंद्र असावे, असे नमूद केले आहे. महापालिकेने योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली असून, शहराच्या आजूबाजूला झपाट्याने नवीन वसाहती निर्माण होत आहेत. त्या वसाहतींमध्ये तब्बल पाच आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येतील.१४ आरोग्य केंद्रे अद्ययावत करण्यात येतील. नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्यासंबंधी चांगल्या सोयी- सुविधा देण्याचा मानस आहे.नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत १५१ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रियाही मनपाने सुरू केली आहे.
केंद्र सरकारकडे १५० कोटींची मागणी
By admin | Updated: June 16, 2014 01:08 IST