औरंगाबाद : ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा जयघोषात आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी झाली. टीव्ही सेंटर चौकातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होत होती. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध उत्सव समितींच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सार्यांना आकर्षण होते ते हडकोतील टीव्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अवतीभोवती आकर्षक रोषणाई व कारंजाचे. येथे सकाळपासूनच नागरिकांची गर्दी उसळली होती. प्रत्येक संघटनेच्या वतीने शिस्तीत महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बुलंद छावाप्रणीत छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी अभिवादन करण्यात आले. नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौर कला ओझा, महेश माळवतकर, प्रभाकर मते, राजगौरव वानखेडे, किशोर नागरे, बाळासाहेब थोरात, सुनील शिसोदिया, दादाराव बोरसे, सतीश वेताळ, मनोज गायके आदी उपस्थित होते. या संघटनेच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी अध्यक्ष सुरेश जुये, रोहित देशमुख, विलास उबाळे, धनंजय मिसाळ, रामेश्वर राजगुरे आदींनी परिश्रम घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदेश चिटणीस प्रा. माणिकराव शिंदे पाटील, नगरसेवक अभिजित देशमुख, विश्वनाथ स्वामी, राजू खरे, शैलेश भिसे, साहेबराव घोडके, हनुमंत कदम, विजय म्हस्के, गोपी विटके, अनुप भोसले, लता पाटील, छाया मोढेकर, दिलीप रगडे, अनिल ताठे आदींची उपस्थिती होती. मयूरपार्क येथील सर्वपक्षीय छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. ढोल व झांज पथकाने उत्साह निर्माण केला. छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा केलेला युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मिरवणूक टीव्ही सेंटर येथील चौकात पोहोचली. तेथे संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मिरवणुकीसाठी गीतेश सोनवणे, तातेराव देवरे, ललित सरदेशपांडे, नितेश वहाटुळे, आनंद पगारे आदींनी परिश्रम घेतले. ‘संभाजी होता दणकट, पोलादी मनगट...’ ‘छत्रपती संभाजी होता दणकट, पोलादी मनगट, सिंहाच्या जबड्यात घालुनी हात, फाडितो जबडा, मोजतो दात... जीऽ जीऽ जीऽ’ असा पोवाडा शाहीर सुरेश जाधव यांनी पहाडी आवाजात सादर केला तेव्हा उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला. प्रसंग होता छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त टीव्ही सेंटर चौकात आयोजित पोवाड्याच्या कार्यक्रमाचा. अखिल भारतीय छावाप्रणीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर जाधव यांच्या खड्या आवाजाने आसमंत दुमदुमून गेला होता. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासूनची कर्तृत्वगाथा पोवाड्यातून गायली. त्यांना शाहीर यशवंत जाधव, प्रभाकर रेणुके, रामभाऊ खरात, मुरलीधर ताकवले, सुरेश वल्ले यांनी साथ दिली. या कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे पाटील, भरत सहाने, बाळू औताडे आदींनी परिश्रम घेतले.
संभाजी महाराजांची जयंती उत्साहात
By admin | Updated: May 15, 2014 00:27 IST