नागेश काशिद ,परंडाशहरातील जुना सरकारी दवाखाना परिसरात मागील काही वर्षापासून ‘प्रति घर प्रति आठवडा बचत’ या अभिनव संकल्पनेअंतर्गत जयंती साजरी करण्यात येत होती. या परिसरात कष्ट करून उदरनिर्वाह भागविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यातील बहुतांश जणांच्या आठवड्याला पगार होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी इतरांकडून वर्गणी गोळा करण्याऐवजी आपणच पैसे जमवून जयंती साजरी करावी, असा विचार येथील कार्यकर्त्यांनी केला. त्याप्रमाणे येथे असलेल्या ४० घरांची यादी तयार करण्यात आली. प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार त्याने वर्गणी द्यावी, असे ठरले. त्यानंतर आठवड्याला प्रति घर बचत केलेले साधारणत: २० रुपये कमिटीने नियुक्त केलेल्या व्यक्तीकडे सदर वर्गणीदाराने स्वत:हून जमा करण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या चाळीसही कुटुंबांनी वर्षभर प्रत्येक आठवड्याला आपली वर्गणी कमिटीकडे जमा केली. अशा पद्धतीने वर्षभर जमा झालेली रक्कम जयंतीसाठी वापरली जात असे. मागील तीन वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत होता. याचे अनेकांनी कौतुक केले होते. विशेष म्हणजे, या मंडळाची मिरवणूकही शांततेत होत असे. अनेकजण स्वत:हून मंडळाकडे वर्गणी जमा करीत असत. या सर्व वर्गणीचा चोख हिशोब ठेवून तो मांडण्याची प्रथा होती. मात्र यंदा एकच जयंती साजरी करण्याचा निर्णय झाल्याने या मंडळानेही संयुक्त जयंती महोत्सवात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे अरुण बनसोडे, प्रशांत बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, अक्षय बनसोडे आदींनी सांगितले.उस्मानाबाद : येथील भीमछावा सामाजिक संघटना आणि पीसी कंपनी यांच्या वतीने वर्गणी न घेताच यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांनी सांगितले. रणजीत कांबळे, अमर चिलवंत, सत्यवान भालेराव, रोहित शिंगाडे आदींची या बैठकीला उपस्थिती होती. बाबासाहेबांच्या विचारांना साजेसे कार्य करण्याच्या इच्छेतून इतरांकडे वर्गणी न मागता जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचे चिलवंत यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत अनेकजण वर्गणी मागतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. हे टाळण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या बैठकीत जयंती समिती जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी आकाश गायकवाड, उपाध्यक्ष विकास खुने, सचिव अजय गायकवाड, कोषाध्यक्ष रोहित शिंगाडे, तर सदस्य म्हणून अमर चिलवंत, सत्यवान भालेराव, किरण क्षीरसागर, संतोष हुंडे, रावसाहेब मस्के, प्रकाश कांबळे, विकी नाईकवाडे, संतोष वाघमारे, विकी माळाळे, रोहित नाईकवाडे, सिद्धोदन शिंगाडे, संतोष खुने आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.
बचतीतून होत होती जयंती साजरी
By admin | Updated: April 9, 2015 00:12 IST