औरंगाबाद : सावकारी जाचाला वैतागून राजेश अंगत पाटील (४०, रा. पुंडलिकनगर परिसर) या व्यावसायिकाने बुधवारी आपल्या दुकानातच फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्यांना असे टोकाचे पाऊल उचलण्यास जबाबदार असलेल्या सावकारांपैकी एक असलेला निवृत्ती केशव पालवे (रा. एन-६, सिडको) याला सिडको एमआयडीसी पोलिसांनी रात्री अटक केली. दुसरा सावकार अद्याप सापडलेला नाही.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश पाटील यांची पूर्वी वाळूज औद्योगिक वसाहतीत एक कंपनी होती. तेथे तोटा झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी सिडको एन-१ भागातील भारत बाजारसमोर चारचाकी वाहनांच्या स्पेअर पार्टचे दुकान सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी काही खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्या बदल्यात सावकारांनी त्यांच्याकडून कोरे धनादेश लिहून घेतले होते. विशेष म्हणजे कर्जाची फेड केल्यानंतरही सावकार त्यांना ‘त्या’ कोऱ्या धनादेशाच्या आधारे ‘ब्लॅकमेल’ करीत होते. आणखी पैसे दे, नाही तर गुन्हा नोंदवू, अशा धमक्या ते देत होते.सावकाराच्या या जाचाला वैतागूनच अखेर राजेश पाटील यांनी मंगळवारी मध्यरात्री आपल्या दुकानातच फाशी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही सावकारांची नावे आढळून आली होती. त्यातील एक निवृत्ती पालवे या सावकाराला सिडको एमआयडीसी पोलिसांनी काल रात्री अटक केली. त्याच्याकडून पाटील यांनी एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. ती रक्कम दिल्यानंतरही पालवेकडून जाच सुरू होता, असे चिठ्ठीत नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले. चिठ्ठीत नाव असलेला दुसरा सावकार हा एन-२ परिसरातील रहिवासी असून तो कमिशन एजंट आहे, तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
आत्महत्येप्रकरणी सावकार गजाआड, अन्य एक फरार
By admin | Updated: December 12, 2014 00:55 IST