पैठण : तालुक्यातील आवडेउंचेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा दुकान व केरोसीन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री यांनी काढला आहे. स्वस्त धान्य दुकानदार बाबासाहेब नारायण पवार यांच्या विरुद्ध पैठण तहसीलदारांकडे बहुतांश शिधापत्रिकाधारकांनी तक्रार अर्ज दाखल केले होते. या अर्जांची दखल घेत १६ आॅगस्ट २०११ रोजी नायब तहसीलदारांनी दुकानाची तपासणी केली. यावेळी पवार यांनी दुकानाचे ‘अभिलेखे’ तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाहीत, असा अहवाल नायब तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सादर केला. यानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पवार यांच्या दुकानाचा व केरोसीनचा परवाना ८ सप्टेंबर २०११ ला निलंबित केला.याबाबत बाबासाहेब पवार यांनी उपआयुक्त (पुरवठा) यांच्याकडे अपील केले. यानुसार त्यांच्या तपासणीत पैठण तहसीलच्या पुरवठा विभागाने न्याय पद्धतीचा अवलंब केला नाही. लाभार्थींचे जबाब शपथपत्रावर घेण्यात आले नाहीत, शिवाय जबाबदार नोंदविणारे लाभार्थी आहेत की नाहीत, हे स्पष्ट होत नाही, हे स्पष्ट करून धान्याचा अपहार झाला नसल्याचे स्पष्ट नमूद करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दुकान व केरोसीनचा परवाना रद्द करण्याचे काढलेले आदेश रद्द करून फेरतपासणी करण्याचे आदेश दिले. यानंतर तक्रारदार बाबुराव बेळगे, रा. लाखेफळ यांनी उपायुक्त (पुरवठा) यांच्या आदेशाविरुद्ध अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पुनरीक्षण अर्ज ७ फेब्रुवारी १४ रोजी सादर केला होता. या अर्जावर अनिल देशमुख यांनी पवार यांच्या दुकानाचा व केरोसीनचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश दिला आहे.बाबासाहेब पवार हे पं.स.चे उपसभापती, तर जालना जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. ते म्हणाले की, सदर सर्व प्रकरण राजकीय द्वेषातून सुरू असून, राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याने वजन वापरून सुनावणीची संधी न देता एकतर्फी कारवाई करण्यास भाग पाडले.या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सदरील सर्व प्रकरण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द
By admin | Updated: June 16, 2014 01:10 IST