वीरेगाव : मागासवर्गीयांच्या ताब्यात असलेल्या रामनगर येथील गायरान जमिनीवर कब्जा करण्यासाठी गेलेल्या गेंदालाल राजाराम झुंगे व इतरांनी केलेल्या हल्ल्यात राजू आढाव नामक व्यक्ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, यात एक कुडाच्या झोपडीसह एक जीप व तीन मोटारसायकलीही जाळण्यात आल्या. बुधवारी दुपारी १२.३० वाजेपासून हा प्रकार सुरू होता. मौजपुरी ठाण्याच्या सहायक निरीक्षक मीना कर्डक यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांना प्रक्षुब्ध जमावाला आटोक्यात आणताना काठ्या आणि दगडांचा मार सहन करावा लागला. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी तात्काळ विविध पोलिस ठाण्याची कुमक पाठवून परिस्थितीवर नियंत्रणात आणली. रामनगर येथील गायरान जमीन गट क्रमांक २०० मध्ये बाबूराव काळाजी आढाव यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ताबा होता. या जमिनीवर कब्जा करण्यासाठी जालना येथील काही जणांनी बळाचा वापर करून सिमेंटचे पोल रोवण्यास सुरूवात केली. त्याला आढाव कुटुंबाने विरोध केला. त्यावेळी गेंदालाल राजाराम झुंगे, शांतीलाल राजाराम झुंगे, गोविंदलाल राजाराम झुंगे, पवन शांतीलाल झुंगे, कांतीलाल झुंगे, विठ्ठल गणपत पवार, लहूजी गुणाजी पवार यांच्यासह ४० ते ५० जणांनी बाबूराव आढाव यांच्यासह कुटुंबीयांना मारहाण केली. या प्रकाराने तणाव वाढला. दरम्यान, आपल्या कुटुुंबीयांस संबंधितांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आढाव यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीव्दारे म्हटले असून, या हल्ल्यात शेतात सोनाजी थोरात यांच्या मालकीचे कुड व पत्राचे घर जळाल्याने २ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यात राजू आढाव हा तरूण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, मौजपुरी ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. कब्जा करण्याचा प्रकार टाळण्यासाठी गेंदालाल झुंगे यांनी एक लाख रूपये खंडणीची मागणी केल्याचे आढाव यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर झुंगे यांनी आपल्या जमिनीवर या कुटुंबीयांनी कब्जा केल्याचे म्हटले. (प्रतिनिधी)तणावानंतर परिस्थिती नियंत्रणातगायरान जमिनीच्या कब्जावरून बुधवारी दुपारी १२.३० वाजेपासून सुरू असलेल्या या तणावाने बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या हल्ल्यात काही पादचारी व वाहनधारकांना मार खावा लागला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली खरी, परंतु उशिरापर्यंत रामनगर आणि परिसरात तणाव कायम होता. जालना-मंठा मार्गावर बराच वेळपर्यंत वाहतूकही ठप्प झाली होती. या प्रकाराबाबत तर्क-वितर्कांना उधान आले आहे.
दोन गटांत तुंबळ हाणामारी
By admin | Updated: June 12, 2014 01:39 IST