जिंतूर : कापड खरेदी करण्याच्या बाहण्याने दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन कापडाची चोरी करणार्या नांदेड येथील पाच बुरखाधारी महिलांना जिंतूर पोलिसांनी गजाआड केले. या महिलांनी १७ मे रोजी ३२ हजार रुपयांचे कापड चोरुन नेले होते. तशाच प्रकारची चोरी पुन्हा करण्याच्या उद्देशाने २६ मे रोजी या महिला त्याच दुकानात परत आल्या होत्या. शहरातील बाबुराव दामोदर कोकडवार या कापड दुकानात २६ मे रोजी या महिलांना पकडण्यात आले. सदरील महिला या नांदेड येथील आहेत. १७ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास या महिलांनी बाबुराव दामोदर कोकडवार या कापड दुकानात प्रवेश केला. पंजाबी ड्रेस व जीन्स पॅन्ट खरेदी करावयाचे आहे, असे म्हणून या महिलांनी कापड दुकानाच्या काऊंटरवर उभे राहून नोकराची नजर चुकवून १६ पंजाबी ड्रेस किंमत २० हजार रुपये व ८ जीन्स पॅन्ट किंमत १२ हजार रुपये असा ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. रात्री दुकान बंद करीत असताना दुकानाचे मालक मंदार कोकडवार व इतरांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता बुरखाधारी महिलांनी ही चोरी केल्याचे लक्षात आले. त्याच दिवशी जिंतूर पोलिसात रितसर तक्रारही देण्यात आली होती. घटनेच्या सात दिवसानंतरही जिंतूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. याच महिलांच्या टोळक्याने २६ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याच दुकानात परत प्रवेश केला. अगोदर झालेल्या चोरीमुळे दुकान मालकाला या महिलांचा संशय आला. मालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांना या संदर्भातील माहिती देण्यात आली. पोलिसांचा ताफा दुकानात आल्यानंतर महिलांची भंबेरी उडाली. या सर्व महिलांना पोलिस स्थानकात आणण्यात आले. सुरुवातीला त्यांनी आपण वसमत येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविण्याची भिती दाखविल्याने महिलांनी नांदेड येथील असल्याचे सांगितले. दरम्यान, या घटनेची फिर्याद मंदार कोकडवार यांनी जिंतूर ठाण्यात दिल्यावरुन अशिया बेगम ऊर्फ तुरा बेगम शेख नय्युम (३०), शे. गुलाबशाह बेगम शे.अशफाक (१८), शेख फरिदाबेगम शेख साबेर (१९), शेख उस्मा बेगम सय्यद जावेद (२०), सय्यद आयमदीबेगम सय्यद अफजल (३२) या सर्वांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (वार्ताहर)सदरील महिलांनी मागील अनेक दिवसांपासून मराठवाड्यातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या दुकानात माल खरेदी करण्याचे निमित्त करुन अनेक ठिकाणी चोर्या केल्या आहेत. या संदर्भात नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे समजते. या महिलांना दुकानदाराच्या सावधनतेमुळे गजाआड करण्यात आले. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
बुरखाधारी टोळीला रंगेहाथ पकडले
By admin | Updated: May 28, 2014 00:39 IST