औरंगाबाद : माझ्यासोबत तू बोलत जा. नाही बोललीस तर तुझे अश्लील व्हिडिओ फेसबुकवर टाकीन, अशी धमकी देत एका विवाहितेला ब्लॅकमेल करणार्या भामट्यास सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी जेरबंद केले. कपिल गोविंदराम ललवाणी (३०, रा. छाजेडनगर, कन्नड), असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कपिल ललवाणी याने एका महिलेच्या मोबाईलवर सतत संपर्क साधून तिला बोलण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने त्या महिलेला धमक्याही दिल्या. अशा प्रकारे सतत ब्लॅकमेल करणार्या या भामट्याच्या छळाला कंटाळून अखेर त्या विवाहितेने सायबर क्राईमचे निरीक्षक गौतम पातारे यांचे कार्यालय गाठले. तिथे तिने त्या भामट्याविरुद्ध लेखी तक्रार दिली. याशिवाय ७ मे रोजी त्या भामट्याने सदरील महिलेच्या व्हॉटस्अपवर पाठविलेल्या महिलांच्या दोन अश्लील फोटोच्या प्रिन्टही पोलिसांना सादर केल्या. त्यानुसार निरीक्षक गौतम पातारे व त्यांच्या पथकातील कर्मचारी सय्यद रफिक, धुडकू खरे, रेवननाथ गवळी, गणेश वैराळकर, रवींद्र खरात, नितीन देशमुख, ज्योती भोरे आदींच्या पथकाने सदरील भामट्याच्या मोबाईलवरून त्याचा शोध घेतला. तो कन्नड येथील रहिवासी कपिल गोविंदराम ललवाणी हा ३० वर्षीय युवक निघाला. त्याला अटक करून छावणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तुझ्या लग्नाचे फोटो व व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तू जर माझ्याशी बोलली नाहीस, तर ते फोटो फेसबुकवर अपलोड करीन. तुझे व तुझ्या पतीचे अश्लील व्हिडिओही माझ्याकडे आहेत. तुझे एवढे हाल करीन की, तुला तुझा पती सोडून देईल.
महिलेला ब्लॅकमेल करणारा जेरबंद
By admin | Updated: May 17, 2014 01:12 IST