उस्मानाबाद : चार हजार रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी मुरूम ठाण्यातील हवालदार प्रवीण बाळकृष्ण गायकवाड यांच्याविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हवालदार गायकवाड यांनी तक्रारदाराच्या विरोधात आलेल्या अर्जावरून कारवाई न करणे व तक्रारदाराच्या बाजूने वरिष्ठांना अहवाल पाठविण्यासाठी पंचासमक्ष पैशाची मागणी केल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला़पोलिसांनी सांगितले की, मुरूम येथील एका खासगी सावकाराने तक्रारदाराच्या विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली होती़ हा तक्रार अर्ज मुरूम येथील बीट अंमलदार प्रविण गायकवाड यांच्याकडे चौकशीसाठी आला होता़ त्यानंतर हवालदार गायकवाड यांनी तक्रारदाराला बोलावून घेतले़ एका खासगी सावकाराने जीवाला धोका असल्याबाबत तक्रारदार व त्यांच्या इतर नातेवाईकांविरूध्द अर्ज दिला असून, तो आपल्याकडे चौकशीसाठी आहे़ तुमच्यावर कारवाई करून तुम्हाला अटक करावे लागणार असल्याचे सांगितले़ त्यावेळी तक्रारदार यानी सावकारासोबत झालेल्या व्यवहाराची माहिती दिली व कारवाई न करण्याची विनंती केली़ त्यावेळी हवालदार गायकवाड यांनी ‘तुमच्यावर कारवाई करत नाही व अटक पण करत नाही, तुमच्या बाजूने अहवाल पाठवितो़ पण त्यासाठी पाच हजार रूपये आणून द्या’ असे सांगितल्याची तक्रार तक्रारदाराने उस्मानाबाद येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती़ या तक्रारीनंतर ‘एसीबी’चे पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या पथकाने १७ डिसेंबर रोजी मुरूम पोलीस ठाण्यात सापळा रचला होता़ त्यावेळी हवालदार गायकवाड यांनी तक्रारदाराकडे सरकारी पंचासमक्ष तडजोडी अंती चार हजार रूपयांची मागणी केली होती़ मात्र, त्यावेळी पैैसे घेतले नव्हते़ या कारवाईचा अहवाल एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता़ अहवाल आल्यानंतर याप्रकरणी मंगळवारी मुरूम पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे़ या फिर्यादीवरून हवालदार गायकवाड यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)हवालदार गायकवाड यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार आल्यानंतर एसीबीने मरूम ठाण्यात सापळा रचला होता़ त्यावेळी हवालदार गायकवाड यांनी पंचा समक्ष तडजोडी अंती चार हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ मात्र, त्यावेळी पैसे स्वीकारले नसल्याने पुढील कारवाई झाली नव्हती़ वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेल्या अहवालानंतर त्यांच्या सूचनेनुसार मंगळवारी मुरूम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लाच मागितली; हवालदाराविरूद्ध गुन्हा
By admin | Updated: December 31, 2014 01:02 IST