---
औरंगाबाद : चितेगाव औद्योगिक वसाहतीतील आरएल स्टिल कंपनी कोरोनाबाधित रुग्ण उपचारात मदतगार बनून समोर आली आहे. कंपनी केवळ औरंगाबादचीच नव्हे तर शेजारील जिल्ह्यांची सुद्धा ऑक्सिजनची गरज भागवत असून, गुदमरणाऱ्या श्वासांना प्राणवायू पुरवण्याचे काम करत आहे.
कोरोना संक्रमण काळात जिल्हा प्रशासनाने कंपनीच्या ऑक्सिजन प्लांटचे अधिग्रहण केले. सुमारे सात ते आठ हजार क्युबिक मीटर ऑक्सिजनचे उत्पादन क्षमतेनुसार इथे केल्या जाते. शहरावर ऑक्सिजन तुटवड्याचे संकट कोसळण्याची शक्यता निर्माण होताच कंपनीने खुल्या मनाने समोर येऊन केवळ प्लांटच नव्हे तर ऑक्सिजन उत्पादन आणि सिलिंडर रिफिलिंगसाठी ७० ते ८० लोकांची टीमही या कार्यात जुंपली. दिवस रात्र एक करून ऑक्सिजनचे उत्पादन करत दररोज सातशे ते आठशे सिलिंडर भरले जात आहेत. गेल्या सोमवारी सर्वाधिक ९७५ सिलिंडर कोरोना रुग्णांसाठी कंपनीने उपलब्ध करून दिले.
आरएल स्टिलकडून सहज उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनची उपलब्धता पाहून नंदुरबारच्या खा. हिना गावित, हिंगोलीचे खा. हेमंत पाटील, शेजारील जिल्ह्यांतील अनेक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी कंपनीकडे नोंदवली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ऑक्सिजन प्लांट अधिग्रहित करण्यासोबत ऑक्सिजन वितरणाची प्रणालीही ठरवून दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांची ऑक्सिजन समिती, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांच्या परवानगीने हे वितरण सुरू आहे.
कंपनीचे उपाध्यक्ष पी. एम. निजामपूरकर म्हणाले की, सद्य:परिस्थितीत कंपनी कर्मचाऱ्यांतही समाजसेवेची भावना जागृत झाली आहे. त्यामुळे ते स्वयंप्रेरणेने ऑक्सिजन उत्पादन कार्यात काम करत असून त्यासाठी तत्पर आहेत. स्टिल कटिंगच्या कामासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या गरजेपोटी हा प्लांट उभारला होता; पण तो प्लांट कधीतरी लोकांचे जीव वाचवण्याच्या कामी पडेल याचा विचारही केला नव्हता.
ऑक्सिजन उत्पादन व वितरणासाठी कंपनीचे अमोल पालोदकर, सी. पी. पटेल, सचिन ठोसर, मनोज बनकर, बी. एल. यादव, डी. सी. इथपे, बी. जी. मुळे, पूनम सिंह, विजय सागा, प्यारेलाल शाह, सागर वानखेडे यांचे विशेष योगदान आहे.