औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जेट एअरवेजने मुंबईसाठी सध्या ६८ प्रवाशांची क्षमता असलेल्या विमानाऐवजी २७ मार्चपासून १४० प्रवासी क्षमता असलेले बोइंग (७३७-८००) विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दररोज रात्री ९ वाजता मुंबईसाठी उड्डाण घेणारे विमान यापुढे अडीच तास आधी सायंकाळी ६.२० वाजता उड्डाण घेईल. यामुळे त्याच दिवशी मुंबई येथून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानसेवेची कनेक्टिव्हिटी घेता येणार आहे.विविध कामानिमित्त उद्योजक, राजकीय पदाधिकारी मुंबईला जाण्यासाठी विमानसेवेला प्राधान्य देतात. रात्री ९ वाजता उड्डाण घेणारे विमान मुंबईत पोहोचल्यावर तेथून देश-विदेशातील विमानसेवेसाठी प्रवाशांना अनेकदा दुसऱ्या दिवसाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मुंबईमध्ये लवकर पोहोचणाऱ्या विमानांची संख्या वाढण्याची प्रतीक्षा प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांची मागणी आणि गर्दी लक्षात घेऊन जेट एअरवेजने बोइंग विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानसेवेमुळे प्रवासी वाहतुकीची क्षमता दुपटीने वाढणार आहे. तसेच मुंबईसाठी रात्री ९ ऐवजी सायंकाळी ६.२० वाजता विमान उड्डाण घेणार आहे. रात्री ८ वाजेपूर्वी हे विमान मुंबईत पोहोचेल. त्यामुळे तेथून पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांची सेवाही प्रवाशांना घेणे सोपे होईल.प्रवाशांची मागणीप्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबईचे विमान २७ मार्चपासून अडीच तास आधी सोडण्यात येत आहे. तसेच सध्याचे विमान बदलून बोइंग विमानसेवा देण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना मुंबईहून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानसेवा घेणे शक्य होईल, असे जेट एअरवेजचे विभाग व्यवस्थापक अहेमद जलील यांनी सांगितले.विमानतळावरून लवकरच अन्य विमान कंपन्यांची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. विविध शहरांसाठी हवाई सेवा सुरू करण्यासाठी एअर एशिया, इंडिगो आणि स्पाईस जेट या कंपन्यांकडून चाचपणी करण्यात आली आहे. आगामी काही दिवसांत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विमानतळावरून आता बोइंग
By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST