लातूर : आरोग्य विभागाच्या वतीने स्त्री जन्माच्या स्वागताचा जागर जिल्ह्यात घुमतो आहे. परंतु, अद्यापि समाजमन स्त्री जन्माच्या स्वागताला उत्सुक नसल्याचेच दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा किंचित वाढ झाली आहे. परंतु, मुला-मुलींचे प्रमाण आजही असमतोलच आहे. गतवर्षी १०० चा फरक होता. यंदा ७७ चा फरक आहे. तथापि, १००० मुलांमागे ९२३ मुली असल्याचे जिल्ह्याचे प्रमाण आहे.कायद्याचा बडगा आणि प्रबोधनाचा जागर आरोग्य विभागाने चालविला आहे. पीसीएनडीटी अॅक्टचा धाक दाखवून काहीअंशी मुलींचे प्रमाण वाढविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. सोनोग्राफी सेंटर, गर्भपात केंद्रांवर करडी नजर ठेवून गेल्या तीन-चार वर्षांपासून आरोग्य विभागाने तपासणी मोहीम राबविली आहे. त्याचा सकारात्मक फायदा झाला असून, १००० मुलांमागे ९२३ मुलींचे प्रमाण झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत किंचित का होईना प्रमाण वाढले आहे. कायद्याचा धाक दाखवून का होईना हे यश मिळाले आहे. परंतु, अद्याप समाधानकारक मुलींच्या जन्माची वाढ झालेली नाही. ७७ ने प्रमाण कमीच आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत ५० हजार ६२० मुले जन्मली आहेत. त्यात २६ हजार ५७६ मुलांचा समावेश असून, २४ हजार ४४ मुली आहेत. हे प्रमाण सम येण्यासाठी आणखीन काही कालावधी लागेल, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. एक हजार मुलांमागे ९२३ मुलींचे प्रमाण असल्याची ही आकडेवारी आरोग्य विभागाने प्रस्तुत केली आहे. रेणापूर तालुक्यात १५८४ मुलांचा जन्म झाला आहे. त्यात ८०१ मुले, तर ७८३ मुली आहेत. अहमदपूर तालुक्यात ४३२४ मुलांचा जन्म झाला. त्यात २३९५ मुले, १९७९ मुली, औसा तालुक्यात ५०२३ मुलांचा जन्म झाला असून, २६३५ मुले तर २३८८ मुली, चाकूर तालुक्यात ३८१० पैकी १९९४ मुले, १८१६ मुली, देवणी तालुक्यात एकूण २०३६ पैकी १०९९ मुले, ९३७ मुली, जळकोट तालुक्यात एकूण ११३३ पैकी ६२३ मुले, ५१० मुली, लातूर तालुक्यात एकूण १५०९८ पैकी ७९७२ मुले, ७१२६ मुली, निलंगा तालुक्यात ८३०३ पैकी ४२१७ मुले, ४०८६ मुली, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ११७९ पैकी ६५१ मुले, ५१८ मुली, उदगीर तालुक्यात ८१४० पैकी ४२३९ मुले, ३९०१ मुली जन्मल्या आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यात हजार मुलांमागे तालुकानिहाय मुलींचे प्रमाण असे : अहमदपूर-८२४, रेणापूर-९७५, औसा-९०४, चाकूर- ९०९, देवणी- ८५३, जळकोट-८१८, लातूर-८९३, निलंगा- ९६९, शिरूर अनंतपाळ- ७८४, उदगीर तालुक्यात १००० मुलांमागे ९२८ मुली आहेत.
उमलण्याआधी अजूनही खुडल्या जाताहेत कळ्या..!
By admin | Updated: August 25, 2014 01:38 IST