उस्मानाबाद : दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आदी आस्मानी-सुलतानी संकटांनी पिचलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी वेळ अमावस्येनिमित्त काळ्या आईची यथोचित पूजा केली़ निसर्गाचे सतत येणारे संकट दूर होवून चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी साकडे घातले़ शहरी भागात अघोषित संचारबंदी असली तरी अनेकांनी सहकुटुंब वनभोजनाचा आनंद लूटला़जिल्हाभरात दिवाळी पाडव्या दिवशी शेतात पाच पांडवांचे पूजन केले जाते़ वेळ अमावस्येला या पांडवांना ज्वारीच्या ताटांचा कोपा करून यथोचित पूजा करण्यात आली़ हर हर महादेवऽऽ च्या जयघोषात हा सण साजरा करण्यात आला़ वेळ अमावस्येनिमित्त शेजारी, ग्रामस्थांसह पाहुण्यांनी शेतशिवार फुलून गेले होते़ तामलवाडी (ता़तुळजापूर) परिसरात साडेतीन गावे वगळता इतरत्र हा सण उत्साहात साजरा करण्यात आला़ रविवारी अमावस्येच्या दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात निमंत्रितांसह शेतकऱ्यांनी वन भोजनाचा आनंद लुटला. सुवासिनी महिलांनी ज्वारीच्या शेतीला फेरी मारून शिवार फेरी पूर्ण केली. ताकाला बाजरीचे पीठ लावून तयार केलेली अंबील प्राशन करून चव चाखली. सायंकाळी साडेपाच वाजता ज्वारीची ताटे टोपलीत घेऊन म्हातारी तयार केली. त्यात गोड्या तेलाचा दिवा लावून ही म्हातारी गावात महादेवाचा जयघोष करीत दिवा लावलेली टोपली घरी आणली. असा होता मेनूशेंगदाण्याच्या पोळ्या, बाजरीचे उंडे, पालेभाज्यांपासून तयार केलेली समिश्र पालेभाज्यांची भजी, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, ताकाला ज्वारी अथवा बाजरीचे पीक लावून तयार केलेली अंबील यासह भात असा मेनू होता. (वार्ताहर)४तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी), वडगाव लाख, सारोळा व अर्धे देवसिंगा तूळ अशा साडेतीन गावात वेळ अमावस्येचा सण साजरा केला गेला नाही. या साडेतीन गावात परंपरागत मकर संक्रांतीच्या दिवशी शेतात जाऊन काळ्या आईची पूजा करून वन भोजनाचा आनंद घेतला जातो, असे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी घातले काळ्या आईला साकडे
By admin | Updated: December 22, 2014 01:00 IST