औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत भाजपाला शिवसेनेच्या वॉर्डांतून मताधिक्य मिळाले. परिणामी, सेनेच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. स्थानिक नेत्यांनी नगरसेवकांवर प्रश्नांचा भडिमार करण्यास सुरुवात केली आहे. वॉर्डनिहाय बैठकांत नगरसेवकांना अनेक चांगले-वाईट अनुभव येत असून, इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश देण्याचे प्रमाण वाढले आहे. नवचैतन्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवड्यात समर्थनगर येथील प्रचार कार्यालयात सेनानेते सुभाष देसाई, विनोद घोसाळकर यांनी पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघातील शिवसेना नगरसेवकांच्या वॉर्डांत भाजपाला मिळालेल्या मतांचा आढावा घेऊन नगरसेवकांचा प्रश्नोत्तरांचा तास घेतला. महापौर कला ओझा यांच्यासह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांच्या वॉर्डातून भाजपाला जास्तीचे मतदान झाल्यावरून नेत्यांनी सर्वांना सद्य:स्थिती काय आहे, हे विचारले होते. वॉर्डांमध्ये नगरसेवकांनी भरपूर कामे केली आहेत. कोट्यवधींची कामे केली, मग त्या तुलनेत शिवसेना उमेदवारांना मते का मिळाली नाहीत, असा सवाल प्रभागांच्या बैठकीत उपस्थित होतो आहे. त्यामुळे नगरसेवकांची पाचावर धारण बसत आहे. हर्सूल, पुंडलिकनगर, गजानन कॉलनी, गुलमंडी, सुरेवाडी आदी भागांमध्ये सेनेचे पीछेहाट झालेली आहे. महापौरांना तर त्यांच्या वॉर्डात ३०० च्या आसपासच मते मिळाली. मग ज्या भागांमध्ये सेनेचे नगरसेवक आहेत तेथे भाजपा आघाडीवर आणि जेथे भाजपाचे नगरसेवक आहेत, तेथून सेना आघाडीवर दिसते. याचा अर्थ भाजपाच्या वॉर्डात सेनेचे पदाधिकारी अॅक्टिव्ह आहेत. बैठकीत बिंग फुटत असल्यामुळे नगरसेवकांची पाचावर धारण बसली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला आतून सहकार्य केल्याचा फटका आता मनपा निवडणुकीत विद्यमान नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना बसणार आहे.
भाजपाला मताधिक्य; सेनेत अस्वस्थता
By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST