औरंगाबाद : लायन्स क्लब मिडटाऊन या सामाजिक संस्थेच्या २५ व्या वर्षानिमित्त शेंद्रा परिसरात ‘वृद्धाश्रम’ उभारण्यात येणार आहे. शनिवारी या वृद्धाश्रमाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. लायन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष सीताराम अग्रवाल यांनी आपले वडील स्व. रतनलाल अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृद्धाश्रमासाठी २७ हजार स्वे.फू. जागा दिली आहे. भूमिपूजन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. राजकुमार धूत, खा. चंद्रकांत खैरे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, आ. सुभाष झांबड, लायन्सचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष नरेश अग्रवाल, माजी आ. प्रदीप जैस्वाल, भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, उद्योजक ऋषी बागला, नंदकिशोर कागलीवाल, प्रांतपाल कमल मानसिंगका यांची उपस्थिती होती. वृद्धाश्रमाला जागा दिल्याबद्दल प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शांता अग्रवाल, सीताराम अग्रवाल व छाया अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. वृद्धाश्रमाचे भूमिपूजन झाले; पण येथे येण्यासारखी परिस्थिती वृद्धांवर येऊ नये, अशी प्रार्थना करीत अग्रवाल यांनी सांगितले की, वृद्धांना त्यांच्या मुलांनी, नातेवाईकांनी येथे आणल्यावर प्रथम त्यांनी आपल्या कुटुंबातच राहावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. जर तसे झाले नाही तर मग वृद्धाश्रमात त्या आजी-आजोबांना ठेवू व संपूर्ण लायन्सचे पदाधिकारी आपल्या आई-वडिलांसारखी त्यांची सेवा करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. येथील वृद्धांना शेठ नंदलाल धूत हॉस्पिटलतर्फे नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल, असे आश्वासन खा. धूत यांनी दिले.या वृद्धाश्रमासाठी लायन्स क्लबच्या वतीने ७५ हजार डॉलर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द नरेश अग्रवाल यांनी दिला. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत राहिलेला अर्धवट रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन हरिभाऊ बागडे यांनी दिले. सूत्रसंचालन महावीर पाटणी यांनी केले. यावेळी लायन्सचे सर्व पदाधिकारी हजर होते.
शेंद्र्यातील वृद्धाश्रमाचे भूमिपूजन
By admin | Updated: December 21, 2014 00:17 IST