औरंगाबाद : क्रांतीचौक पोलिसांनी अटक केलेल्या भोंदूबाबाविरुद्ध गेल्या वर्षी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. पीडित अल्पवयीन युवतीच्या आईचा त्याने विनयभंग केला होता.दरम्यान, राजीवनगर येथील १६ वर्षीय मुलीचा वैद्यकीय चाचणी अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. दुसरीकडे भोंदूबाबाची पत्नी विमलबाई ही अद्यापही फरारच आहे. तिच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली असून लवकरच ती पोलिसांच्या हाती लागेल, असा विश्वास तपास अधिकारी महिला उपनिरीक्षक निर्मला परदेशी यांनी व्यक्त केला आहे. काल सदरील भोंदूबाबाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध अल्पवयीन युवतीचा लैंगिक छळ, विनयभंग व जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी पीडित युवतीच्या आईचा नाना गिऱ्हे या भोंदूबाबाने वियनभंग केला होता. त्याच्याविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. राजीवनगरात नाना बाबूराव गिऱ्हे (४५) याने स्वत:च्या घरात सैलानीबाबाचे ठाणे मांडले असून तो परिसरातील गोरगरीब लोकांच्या श्रद्धेशी खेळत असल्याची बरीच माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. कोणाला भूत लागले, कोणाला करणी केली, मूल होत नाही, आजारपण दूर करणे, धन काढून देण्याची थाप मारून अनेकांची त्याने फसवणूक केली आहे.राजीवनगर येथील एक युवती बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. ती ८ जून रोजी रात्री ८.३० वाजेला शौचासाठी घराबाहेर गेली होती. तेथून काही मिनिटांत ती परत घराकडे जात असताना भोंदूबाबाची पत्नी विमल नाना गिऱ्हे हिने तिच्या हातात लिंबू देऊन तिला घरी नेले. घरात बसलेल्या भोंदूबाबा नाना गिऱ्हे याने मग तिला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले.
भोंदूबाबा हा विनयभंगाच्या गुन्ह्यातीलही आरोपी
By admin | Updated: June 15, 2014 00:54 IST