उस्मानाबाद : भीम रक्तात, भक्तात आला, देव केले त्याला जाया केला. नव्या मनुचा विषारी घाला, जाती-पातीत कोंडलं त्याला. भीम मुक्तीचं दार गं माय, भीम निळाईच्या पार गं माय..! हे भीमगीत राहुलदेव कदम यांनी गायिलं. आणि उपस्थितांतून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. निमित्त होतं, जेतवन कॉलनी आणि संविधान फाऊंडेशनच्या वतीने बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित ‘ भीम निळाईच्या पार गं माय..’ या कार्यक्रमाचे. आशयघन कवितांना संगिताची जोड देत सुरू झालेली ही भीम गीतांची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. गीतकार श्रीराम पोतदार यांनी, ‘भीमाई म्हणजे काय गं..., भीमाई माझी माय गं.., तुझ्या काशीहूनही प्यारे, मला भीमरायांचे पाय गं..’ हे गीत सादर करून या मैफलीला वेगळ्या उंचीवर नेले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग कर्तृत्वावर आधारित ‘दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर..एक त्या चवदार तळ्यावर..हे गीत सादर केले. पोतदार यांनीच सादर केलेल्या ‘मनगटात बळ हत्तीचे..डोळ्यात आमुच्या आग..आम्ही भीमरायांचे वाघ..’ हे गीतही पहाडी आवाज सादर केले. कवी वसंत बापट यांनी लिहिलेल्या, ‘चवदार तळ्याच्या काटी रोवून पाय खंबीर.., राहिला उभा दलितांचा सेनानी रणगंभीर..’ या स्फूर्तीदायक गीताच्या माध्यमातून जयभीमचा घोष केला. यावेळी मैफलीला उपस्थित असलेल्यांनीही तितक्याच ताकदीने पोतदार यांच्या या गीताला दाद दिली. त्यानंतर राहुलदेव कदम यांनी मैफलीची सूत्रे आपल्या हाती घेतली. माणसाला जाळणार्या माणसा, शिवाशिव पाळणार्या माणसा..आज तुझा काळ तुला भेटला...भीम- फुले माणसाला भेटला, लढा माणसांचा आज इथे पेटला...हे भीमगीत सादर केले. याबरोबरच वामनदादा कर्डक यांचे ‘फाशी द्या फाशी.. फाशी द्या फाशी..कुणी बनविले आज आम्हाला दलित आदिवासी...हे गीत सादर केले. मैफलीला बंडू मुळे यांनी तबल्यावर, शिवाजी पोतदार यांनी व्हायोलिन, बंटी देडे यांनी ढोलकीवर, सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी सिंथेसायझर तर दीपक शिंदे यांनी ढोलकवर साथ दिली. मैफलीचे सूत्रसंचालन रवि केसकर यांनी केले. या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता मुकुंद भालेराव, सोलापूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत यांच्यासह डॉ. आंबेडकर कारखान्याचे संचालक चित्राव गोरे, शिवराज्य पक्षाचे बलराज रणदिवे, नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, डी. के. शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संविधान फाऊंडेशनचे सुजित ओव्हाळ, रमाकांत गायकवाड, हुंकार बनसोडे, दीपक गायकवाड, शिवाजी गवळी यांच्यासह प्रा. महेंद्र चंदनशिवे, रवि सुरवसे, बाबासाहेब मस्के, गौतम कांबळे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
भीम मुक्तीचं दार गं माय...भीम निळाईच्या पार गं माय..!
By admin | Updated: May 20, 2014 01:14 IST