परभणी : एलआयसीच्या पॉलिसीधारकांना लाभांश जमा करण्याचे आमिष दाखवून त्यांचा बँक खाते क्रमांक बनावट नावाच्या व्यक्तीकडून विचारला जात असल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी काही जणांनी एलआयसी कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत़ परभणी येथील रामकृष्णनगर भागातील रहिवाशी तथा शिवाजी महाविद्यालयातील प्रा़ जवळेकर यांना नुकताच ०९३११०६८३६३ व ०९३५०१३०२५७ या दोन मोबाईल क्रमांकावरून एकवेळ सकाळी १० वाजता तर दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजेच्या सुमारास फोन आला़ समोरील व्यक्तीने त्यांचे नाव जय शर्मा व राहुल खन्ना असे सांगितले़ प्रा़ जवळेकर यांना त्यांनी तुमच्या एलआयसीचा ९० हजार ते १ लाख रुपयापर्यंत लाभांश आला आहे, तो तुमच्या बँक खात्यावर जमा करावयाचा आहे़ खाते नंबर सांगा, अशी विचारणा केली़ प्रारंभी प्रा़ जवळेकर यांनी याकडे दुर्लक्ष केले़ परंतु, दुसऱ्यांदा पुन्हा त्यांना फोन आल्याने त्यांनी या बाबत त्यांच्या एलआयसी एजंटकडे चौकशी केली़ तसेच या बाबतची लेखी तक्रार एलआयसी कार्यालयाकडे दिली़ या शिवाय अन्य काही पॉलिसीधारकांना असे फोन आले असल्याचे समजते़ त्यातील काहींनी याला होकारही दिला़ समोरील व्यक्तीच्या बुलथापांना प्रतिसाद दिला नसल्याने त्याने नंतर फोन केला नाही, असेही तक्रारकर्त्यांनी सांगितले़ या प्रकरणी पोलिसांनीच आता तपास करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे़ (प्रतिनिधी)
बनावट नावाने फोनवर विचारला जातोय बँकेचा खाते क्रमांक
By admin | Updated: September 23, 2014 23:22 IST