गोविंंद इंगळे , निलंगा निलंगा शहरात एकही बालउद्यान नसून शहरातील नवीन वस्तीमध्ये ग्रीन बेल्टचा वापर गाड्या पार्किंग व गुत्तेदारांचे साहित्य ठेवण्यासाठी तर काही ठिकाणी वाळू डम्पिंग केल्याचे चित्र दिसून येत आहे़ परंतु, नगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्यापही बालोद्यानाविना निलंगा शहर दिसून येत आहे़ निलंगा शहरात एकूण २२ पैैकी १० ग्रीन बेल्ट केवळ गुत्तेदारांच्या नगरसेवकांना खूष करण्यासाठी या बेल्टची संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे़ रंगरंगोटी करून संबंधित गुत्तेदारांनी नगरपालिकेला फसविल्याचे चित्र दिसून येत आहे़ आजपर्यंत पालिकेवर तीन टर्म वगळता काँग्रेसचीच अभेद्य सत्ता होती़ प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात बालोद्यानाचा मुद्दा लिहून एकाही पक्षाने अद्यापि, बालोद्यानासंदर्भात नगरपालिकेच्या सभागृहात विषय मांडला नाही़ ही लाजिरवाणी बाब आहे़ केवळ नगरसेवक गुत्तेदारांची मर्जी सांभाळण्यासाठी प्रत्येक ग्रीन बेल्टसाठी ५ ते १५ लक्ष रुपयांपेक्षा जादा निधी पालिकेने उपलब्ध करून गुत्तेदारांना सहकार्य केले आहे़ आजपर्यंत संरक्षक भिंतीसाठी सुमारे ९० लाख रूपये खर्च केले़ मात्र त्यामध्ये लहान मुलांसाठी २ ते ५ लाख रुपयांची खेळणी बसविली असती तर या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत झाला असता़ मात्र पालिकेच्या गुत्तेदारांना खूष करण्याच्या विलासी धोरणामुळे चिमुकल्यांचा आनंदावर विरजन पडले आहे़ शहरातील नवीन वसाहतीमध्ये सुमारे २२ ग्रीन बेल्ट आहेत़ यातील १० ग्रीन बेल्टच्या संरक्षक भिंतीवर सुमारे ९० लक्ष रूपये खर्च करण्यात आले़ मात्र एकाही ग्रीन बेल्टला बालोद्यानाचे स्वरूप न दिल्याने शहरातील ममता गृहनिर्माण, सरस्वती कॉलनी, रामकृष्ण नगर, आंबेडकरनगर, लोंढेनगर येथील चार ग्रीन बेल्ट हाडगा रोडवर पांचाळ कॉलनी या ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत़ तर बहुतांश ठिकाणी ग्रीन बेल्टवरच अतिक्रमण करून ही मैदाने गिळंकृत करण्यात आली आहेत़ तर शहरापासून तीन कि़मी़ अंतरावर हाडगा रोडवर वन विभागामार्फत बालोद्यान विकसित होत आहे़ मात्र हे बालोद्यान शहरापासून दूर असल्याने गोरगरिब पालकांना तेथे जाणे अडचणीचे होणार आहे़
बालोद्यानाविना निलंगा
By admin | Updated: May 15, 2014 00:02 IST