संजय तिपाले, बीडबालाघाटाच्या पर्वतरांगांमधील नायगाव (ता. पाटोदा) येथील विस्तीर्ण मयूर अभयारण्याची दूरवस्था काही संपायला तयार नाही. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या अभयारण्यात पर्यटकांसाठी काडीचीही व्यवस्था नाही. परिणामी ६५ टक्के पर्यटक फिरकत नाहीत. निसर्गाचे देणे लाभलेल्या बीड जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळांचीही याहून वेगळी स्थिती नाही, असा चिंताजनक निष्कर्ष ‘लोकमत’ सर्वेक्षणातून पुढे आला आहे.‘पर्यटनस्थळ सद्यस्थिती व अपेक्षा’ हा विषय घेऊन ‘लोकमत’ने विविध स्तरातील शंभर पर्यटकांची मते नोंदवली. यामध्ये पर्यटकांपुढे पाच प्रश्न ठेवण्यात आले. त्यांनी दिलेली उत्तरे अतिशय निराशाजनक आहेत. जिल्ह्यात पर्यटनस्थळे आहेत. याचीच १० टक्के लोकांना माहिती नाही. मयूर अभयारण्यामध्ये जाता का? या प्रश्नावर ९२ जणांनी नाही, असे उत्तर दिले तर ३ टक्के लोक कधीकधीच जातात. ५ टक्के लोक तर मयूर अभयारण्याकडे फिरकलेलेही नाहीत. कुटुंबियांसह अभयारण्यात जाणाऱ्यांची संख्या तर अतिशय नगण्य आहे. ९५ टक्के लोक एकदाही कुटुंबियांसमवेत अभयारण्यात गेलेले नाहीत. ४ टक्के लोक एकवेळा तर १ टक्के लोक दोनवेळा पर्यटनास गेलेले आहेत. ५० टक्के लोकांना पर्यटनास जाण्यासाठी वेळच मिळत नाही. मयूर अभयारण्यात सुुविधा नसल्याने ४० टक्के लोक जात नाहीत तर २५ टक्के लोकांना राहण्याची व्यवस्था नसल्याने अभयारण्यात येणे आवडत नाही.पर्यटक म्हणतात़़़़२०.९४ हेक्टर क्षेत्रावरील मयूर अभयारण्यात पुरेशा सोयी- सुविधा मिळाल्या पहिजेत अशी पर्यटकांची माफक अपेक्षा आहे. अभयारण्य विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, याकरीता या पर्यटनस्थळाची माहिती जास्तीतजास्त लोकांना होणे गरजेचे आहे. मात्र, नायगावात साधी माहिती पुस्तिकाही उपलब्ध नसते. पर्यटक पैसे मोजायला तयार आहेत;पण त्यांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत.नायगावात अभयारण्याची माहिती असणारे गाईड नाहीत की, सुविधायुक्त हॉटेल्स. निवासी व्यवस्थाही नाही. एक विश्रामगृह आहे पण त्याचा वापर विश्रामासाठी कमी अन् पार्ट्यांसाठीच अधिक होतो. मनोरे, विजेची व्यवस्था नाही. त्यामुळे कुटुंबियांसमवेत अभयारण्यात येणे अनेकांना पसंत नाही. अभयारण्यास पर्यटनाचा दर्जा मिळालेला नाही. अधिकारी केवळ पर्यटनाचा दर्जा द्यावा, या मागणीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवतात;परंतु उदासिनतेमुळे आजवर पर्यटनस्थळाचा दर्जाही मिळालेला नाही. दर्जा मिळालाच तर पर्यटकांना सुविधा पुरविण्याची कुठलीही व्यवस्था नाही. पर्यटनाला गती मिळाली तर बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो;पण पर्यटनस्थळांना अवकळा प्राप्त झाल्याने तरुणवर्ग रोजगारापासून वंचित आहे.पक्षीमित्रांना काय वाटते?पक्षीमित्र सुधाकर सोनवणे यांनी सांगितले की, नायगाव अभयारण्यात मोरांची संख्या जास्त असल्याने या अभयारण्यास मयूर असे नाव पडले. या अभयारण्यात मोरांची संख्या वाढण्याऐवजी घटतच चालली आहे. आजघडीला १४०० मोरांचे अभयारण्यात वास्तव्य आहे. अभयारण्यात पक्षांसाठी बांधलेले पाणवठे, बंधारे तुटले आहेत. त्यामुळे त्यात पाणी साचून राहत नाही. परिणामी प्राणीमात्रांची भटकंती होते, असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांची उदासिनता असल्याने आलेला निधी व्यवस्थित खर्च होत नाही असा आरोप त्यांनी केला. अधिकारी औरंगाबादहून कारभार हाकतात. त्यांनी अभयारण्यात असले पाहिजे, त्याशिवाय त्यांना येथील समस्यांची जाणिव होणार कशी? असा सवालही सोनवणे यांनी केला.येथेही सुविधांचा अभावनायगावपाठोपाठ इतर पर्यटनस्थळेही विकासापासून वंचित आहेत. बीड शहरातील कंकालेश्वर, खंडेश्वरीच्या दीपमाळा, खजाना विहीर, पापनेश्वर मंदिर, विठ्ठलपंथांची समाधी, मन्सूरशहा दर्गा, शंहेशाहवली दर्गा, जटाशंकर मंदिर, बीड तालुक्यातील कपिलधार, अंबाजोगाई येथील मुकुंदराजाची समाधी, योगेश्वरी मंदिर, नागझरी, हत्तीखाने, बुट्टेनाथ, धारुरातील भूईकोट किल्ला, अंबाचौंडी, मकरध्वजाचे मंदिर, परळी येथील वैद्यनाथ मंदिर, झुरळे गोपीनाथ मंदिर, गेवराई तालुक्यातील शनिमंदिर, पाटोदा तालुक्यातील सौताडा, केज तालुक्यातील नांदूरघाट येथील महादजीराजे शिंदे यांच्या पत्नी अन्नपूर्णादेवी यांची समाधी ही पर्यटनस्थळे देखील विकासांपासून वंचितच आहेत. मुलभूत सुविधांसोबतच पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रभावी प्रयत्न झाले नाहीत, त्यामुळे पर्यटनातील ‘उलाढालीं’नाही जिल्हा मुकला आहे. सुविधांसाठी प्रयत्न मयूर अभयाण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी जी. एन. कांबळे म्हणाले, अभयारण्यात पुरेशा सोयी- सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुुरु आहेत. पर्यटकांसाठी विश्रामगृह आहे. पर्यटनाचा दर्जा मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव गेलेला आहे.