औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. बाळू आनंदा चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता आपला पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. चोपडे हे विद्यापीठाचे १५ वे पूर्णवेळ कुलगुरू असतील. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास विद्यापीठातील संवैधानिक अधिकारी, कार्यकारिणीचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. डॉ. चोपडे हे ‘मायक्रोबियल मॉलिक्युलर जेनेटिक्स’ या विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ असून, पुणे विद्यापीठात ते सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. गेल्या तीस वर्षांपासून ते अध्यापन व संशोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांचे ६० पेक्षा जास्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये लेख आलेले असून त्यांनी अनेक परिसंवादांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या नावावर दोन पेटंटस् आहेत. २० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. प्राप्त केलेली आहे. त्यांनी पुणे विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख तसेच बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मटिक्स विभागाच्या संचालकपदाचा कार्यभार सांभाळला आहे.
बी.ए. चोपडे नवे कुलगुरू
By admin | Updated: June 4, 2014 01:35 IST