जालना : घनसावंगी तालुक्यातील आंतरवाली (दाई) येथील दलित समाजाच्या अल्ववयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात गावातील काहींनी कुटुंबियांवर दबाव टाकून घटना दाबण्याचा प्रकार केल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला असून या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. संघटनेचे राज्याचे महासचिव अॅड. रमेश खंडागळे, जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे, गौतम लांडगे, चोखाजी सौंदर्य, जिल्हा संघटक विजय कांबळे , दीपक डोके, परमेश्वर खरात व तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात जिल्हा पोलिस यंत्रणेस बुधवारी एक निवेदन सादर केले. त्याद्वारे या प्रकरणातील काही बाबींवर प्रकाशझोत टाकला. आंतरवाली दाई या खेड्यातील त्या गरीब कुटुंबातील मुलीवर अत्याचार घडल्याची माहिती कळाल्यानंतर सुद्धा पोलिस तीन तासाने घटनास्थळी उशिरा पोहोचले. तसेच गावातील काही व्यक्तींनी मुलीच्या आई-वडिलांवरच दबाव आणून प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न केला, असे नमूद करीत या प्रकरणात गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्याचा संघटनेने आरोप केला. या प्रकरणात सखोल तपास व्हावा, बारकावे पुढे यावेत व कायदेशीर बाबी पूर्ण करून हे प्रकरण जलदगतीच्या न्यायालयात चालवून पीडित मुलीस न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा या संघटनेने केली. पीडित मुलीसह कुटुुंबियांचे शहरात स्थलांतर करावे, कुटुुंबियास २५ लाखांची मदत द्यावी, अशीही मागणी या संघटनेने केली. संपूर्ण जिल्ह्यात या प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. नानेगाव येथील सरपंचाचा खून प्रकरण, वालसावंगीतील अल्पवयीन मुलींची हत्या, परतूर तालुक्यातील बाबूलतारा येथील ग्रामस्थांवरील अन्याय, घनसावंगीतील कंडारी काकडी येथील ध्वजप्रकरण तसेच जाफराबाद तालुक्यातील वरूड येथीलही जातीय तणावाचा प्रयत्न गंभीर आहेत, असे या संघटनेने नमूद केले. आरोपींविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. (प्रतिनिधी) आरोपीस कोठडी दाई अंतरवाली येथे एका अल्पवयीन मुलीवर गावातील विकास बाळू भुतेकर या युवकाने बलात्कार केला. त्याला जालना येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
आंतरवाली प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
By admin | Updated: May 29, 2014 00:40 IST