औरंगाबाद: ओळखीच्या महिलेला मुंबईत शिक्षिकेची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी शहरात घडली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
मेहबूब इब्राहिम शेख (रा. शिरूर , बीड ) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार तरुणी शहरातील रहिवासी असून तिचे शिक्षण बी ए., डी. एड. झाले आहे. सध्या ती कॉलनीतील मुलांच्या शिकवण्या घेते. १० नोव्हेंबर रोजी ती शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी रुम शोधत असताना तिची भेट आरोपी महेबूब सोबत झाली. तेव्हा त्याने तिच्या शिक्षणाबाबत विचारपूस केली. तिने शिक्षण सांगितल्यावर त्याने तिला मुंबईत शिक्षिकेची नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्यांच्या दोन ते तीन वेळा भेटी झाल्या. १४ नोव्हेंबर रोजी त्याने तिला मुंबईला जायचे असल्याचे सांगितले आणि रात्री ९ वाजता जालना रोडवरील हॉटेल रामगिरीसमोर येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पीडिता तेथे पोहचताच तो कार घेऊन तेथे आला. तो तिला घेऊन सिडकोतील एका निर्मनुष्यस्थळी गेला. तेथे त्याने तिच्याशी लगट करण्यास सुरुवात केली. पीडितेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देउन बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद केले. प्रकारामुळे पीडिता प्रचंड घाबरली आणि आजारी पडली होती. दोन दिवसापूर्वी तिने ही घटना तिच्या मावशीला सांगितल्यावर मावशीने तिला धीर देउन सिडको पोलीस ठाण्यात नेले. सिडको पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेऊन महेबूब शेख विरूध्द गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक आश्लेषा पाटील तपास करीत आहेत.