हणमंत गायकवाड लातूरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतीकारी तत्त्वज्ञान साहित्य स्वरुपात मांडण्यासाठी ‘अस्मितादर्श’चा जन्म झाला. मुखवट्याचे साहित्य नाकारुन प्रयोजनमूल्य अन् वास्तववादी साहित्य ‘अस्मितादर्श’ने प्रस्थापित केले. ‘अस्मितादर्श’ ही मानवी मूल्यांची साहित्यधारा आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. गंगाधर पानतावणे म्हणाले, ‘अस्मितादर्श’च्या साहित्यिकांनी केवळ विद्रोह व्यक्त केला नाही. नकारार्थी साहित्य लिहिले नाही. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाचा हुंकार या साहित्यातून प्रकट झाला. हे साहित्य म्हणजेच दलित साहित्य आहे. दलित हा शब्द जातीवाचक नसून, जाणिवा व्यक्त करणारा शब्द आहे. म्हणून आम्ही दलित साहित्याला ‘क्रांती विज्ञान’ म्हणतो. या क्रांती विज्ञानाला प्रस्थापित करण्यासाठी अस्मितादर्शची वाटचाल गेल्या ५० वर्षांपासून आहे. प्रारंभीच्या काळात मान, अपमान सहन केले. परंतु, ही वाङ्मयीन आणि सांस्कृतिक चळवळ थांबली नाही. मध्यमवर्गीयांच्या कल्पनारंजक साहित्याला चपराक देत वास्तववादी साहित्य आणि तेही बाबासाहेबांच्या क्रांतीकारी तत्त्वज्ञानातून निर्माण झाले. सुरुवातीला कोंडलेले, दबलेले शब्द कवितेतून व्यक्त झाले. माणूसपण नाकारलेल्या व्यवस्थेच्या विरोधात प्रहार आणि मूल्य प्रस्थापित करण्यासाठी विचार या कवितेतून व्यक्त झाला. गुलामी, अप्रतिष्ठेचे जीवन जगण्याची परंपरा नाकारून आम्हाला जगण्याचा अधिकार आहे. या जाणिवा दलित साहित्याने दिल्या. कविता, कथा, कादंबरी, नाटकांतून ज्वलंत अनुभव परिवर्तनवादी लेखकांनी मांडल्याचे ते म्हणाले.
‘अस्मितादर्श’ मानवी मूल्यांची साहित्यधारा...
By admin | Updated: January 14, 2017 00:27 IST