पैठण : गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून, धरणात ९०५० क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजता धरणात २०.५५ टक्के जलसाठा झाला होता. याच क्षमतेने पाणी दाखल झाल्यास गुरुवारपर्यंत धरणात २२ टक्के जलसाठा होण्याची शक्यता कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांनी व्यक्त केली.जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या विविध ठिकाणी गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला. त्यात कन्नड-९० मि.मी., राहुरी- ५९ मि.मी. बोरदहेगाव- २९ मि.मी., करंजवण- २२ मि.मी., ओझरखेड- २६ मि.मी., नांदूर मधमेश्वर- ३६ मि.मी., ओझर वेअर- १३ मि.मी., पालखेड- १४ मि.मी., देवगाव रुई- १६ मि.मी., कोपरगाव- १९ मि.मी., येवला- ११ मि.मी., कोतुड- १३ मि.मी. आदींसह अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाचे पाणी जायकवाडीत दाखल होत आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून २१७२ क्युसेक्स व नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून ४७६९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात येत आहे. त्यामुळे नागमठाण येथे सरिता मापन केंद्रावर गोदावरी ६००० क्युसेक्स प्रवाहाने वाहत आहे. हे सर्व मिळून धरणात ९०५० क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत आहे.पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाहीजायकवाडीवरील मुळा धरण- ७३.०३ टक्के, भंडारदरा- ९९.०३ टक्के, दारणा- ९५.६५ टक्के, गंगापूर- ९१.२९ टक्के, करंजवण- ७०.८३ टक्के, नांदूर मधमेश्वर- ९१.०५ टक्के, ओझरखेड- ३९.८८ टक्के, पालखेड- ९४.७१ टक्के, असा जलसाठा झाला आहे. यामुळे या धरणांत यापुढे पावसाचे पाणी अडविण्यासाठी पॉकेट शिल्लक नाही. यापुढे पाऊस झाल्यास ते जायकवाडीकडे सोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
जायकवाडीतील आवक वाढली
By admin | Updated: August 28, 2014 00:23 IST