’वाशी : अटीतटीच्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यात शिवसेनेने मुसांडी मारली असून काँग्रेसची अवस्था ‘जैसे थे’ आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. प्रतिष्ठेच्या लढार्इात तेरखेडा येथे परिवर्तन पॅनेलला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने १० जागा जिंंकल्या आहेत. इंदापूर येथे रमेश पाटील यांनी शिवसेनेसोबत युती करून ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळाले. मात्र, गत निवडणुकीच्या प्रमाणात चार जागा कमी झाल्या आहेत. तहसील कार्यालयाच्या आवारात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार रामेश्वर गोरे यांच्या अधिपत्याखाली ३३ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस १२ टेबलवर प्रारंभ केला. तीन फेऱ्यांमध्ये सर्व ग्रामपंचायतीची मतमोजणी संपली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाल्याचे दिसून येत असून त्यांना स्वबळावर ५ तर शिवसेनेची साथ घेवून दोन ठिकाणी सात्ता मिळाली आहे. शिवसेनेने मात्र तालुक्यात बोटावर मोजण्याइतपते ग्रामपंचायत सदस्य असताना ६ ठिकाणी स्वतंत्ररित्या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर दोन ठिकाणी आणि काँग्रेससोबत ४ ठिकाणी आघाड्या करून गावपातळीवरील राजकारभारात मुसांडी मारली आहे. काँग्रेस पक्षाने ८ ग्रामपंचावतीवर स्वतंत्ररित्या सत्ता मिळवली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेवून २ ठिकाणी तर शिवसेनेसोबत घेत ४ ठिकाणी सत्ता काबिज केली.े तसेच ६ ग्रामपंचायतींमध्ये सर्वपक्षीय पॅनल विजयी झाले आहेत.तेरखेडा येथे युवक वर्ग एकत्र येत परिवर्तन विकास पॅनल स्थापन केला होता. याचे नेतृत्व रणजित घुले व त्यांच्या मित्रमंडळीनी केले. तर काँगे्रसचे तालुकाध्यक्ष बिभीषण खामकर व विद्यमान उपसरपंच दिलीपराव घोलप यांच्याबरोबर आघाडी करून युवकांना शह दिला. यामध्ये त्यांना १० जागेवर विजय मिळाला. इंदापूरचे विद्यमान उपसरपंच रमेश पाटील यांनी शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली होती. तर त्यांच्या विरूध्द काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेत ग्रामपंचायतीमध्ये ४ ठिकाणी विजय मिळवला आहे. पारगाव येथे राष्ट्रवादी काँगे्रसने शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य रामहारी मोटे यांना बरोबर घेत ८ ठिकाणी विजय मिळवित ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. बावी येथे काँग्रेसचे उपाध्यक्ष शामराव शिंंदे यांच्या ताब्यातील ग्रामपंचायत त्यांच्याच पक्षातून बंडखोरी करून निवडणूक लढविलेल्या कार्यकर्त्यानी हिसकावली. तसेच शामराव शिंंदे यांच्या पत्नीस पराभवास सामोरे जावे लागले. मांडवा येथील विद्यमान उपसरपंच नितीन रणदिवे यांच्या पॅनलने ९ पैकी ५ जागा मिळवल्या आहेत. तर विद्यामान सरपंच सुनिल पाटील यांच्या गटास ४ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे भगतसिंंह गहिरवार यांनी ७ महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते यामध्ये त्यांच्या पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. मतमोजणीनंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भिमसिंंग चौहान यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. (वार्ताहर) काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून ‘आमच्याच पक्षाचे जास्त सदस्य निवडून आले’, असा दावा करीत आहेत. मात्र प्रत्यक्ष निवडून आलेले उमेदवार व त्यांच्या गटप्रमुखांकडे विचारणा केली असता, आमच्या स्थानिक पातळीवर आघाड्या झाल्या होत्या, असे सांगितले. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे, हा संशोधनाचा विषय होवू शकतो. असे असले तरी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीनंतरच किती ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात आहेत? हे स्पष्ट होणार आहे.
सेनेची मुसंडी; राष्ट्रवादीची पिछेहाट !
By admin | Updated: August 7, 2015 01:14 IST