औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे बसस्थानकांमध्ये बेवारस वस्तूंना हात लावू नये, पाकीटमार, चोरांपासून सावध राहावे, अशी सूचना देणारी टेप ऐकविली जाते; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने महामंडळाकडून एवढाच सोपस्कार पार पाडला जात असल्याचे मध्यवर्ती बसस्थानकात जागोजागी उभ्या राहणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरून दिसत आहे. थेट बसस्थानकात वाहने उभी केली जात असताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.याठिकाणी सुरक्षा व्यवस्थेच्या ढिलाईमुळे थेट बसस्थानकात कोणीही सहजपणे वाहन घेऊन जाऊ शकतो. प्रवाशांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी येणारे वाहनधारक थेट आतमध्ये वाहन नेण्यावर भर देतात. बसेसची ये-जा करणाऱ्या मार्गाजवळ अशा वाहनधारकांना कोणीही थांबविताना दिसत नाही. बसगाड्यांच्या शेजारीच अस्ताव्यस्त वाहनांची पार्किंग केली जात आहे. गर्दीची ठिकाणेही कायम लक्ष्य राहिली असल्याचे आजपर्यंतच्या घटनांमधून दिसून येते. थेट आतमध्ये होणाऱ्या पार्किंगमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून, अशा प्रकारे थेट बसस्थानकात होणारी पार्किंग रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रवाशांनी सांगितले. एखादी दुर्घटना होण्याआधीच थेट बसस्थानकात होणारी पार्किंग थांबवावी. अशी मागणी होत आहे.
कोणीही यावे, वाहन लावून जावे...!
By admin | Updated: August 25, 2014 00:25 IST