औरंगाबाद : जालना रोडवरील आकाशवाणी चौकात दररोज सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर बॅरिकेड्स लावून हा चौक बंद केला आहे. यामुळे सिडको चौकाकडून बाबा पेट्रोल पंपाकडे जाणारी वाहने आणि बाबा पेट्रोल पंपाकडून सिडको चौकाकडे येणारी वाहने सरळ धावतील. त्यांना येथे कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही; परंतु वाहनचालकांना वळण घ्यायचे असल्यास सेव्हन हिल आणि मोंढा नाका उड्डाणपुलाखालूनच जावे लागणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्यामुळे येथे चौकासारखी रचना दिसणार नाही.शहराची ‘लाईफ लाईन’ म्हणून जालना रोडची ओळख आहे. शहरात ये-जा करणारी लाखो वाहने याच रस्त्यावरून धावतात. विशेषत: दुचाकीचालकांची या रस्त्यावर मोठी संख्या असते.सायंकाळच्या वेळी वाहनांची संख्या वाढल्यावर हा रस्ता जागोजागी ठप्प झालेला दिसतो. उड्डाणपूल वगळता इतर ठिकाणी नेहमी वाहतुकीची समस्या पाहावयास मिळते. आकाशवाणी चौक, अमरप्रीत हॉटेल चौक, एपीआय कॉर्नर, अग्रसेन चौक, उच्च न्यायालयासमोर आदी ठिकाणी सतत वाहतूक ठप्प झालेली असते. यापैकी आकाशवाणी चौकात वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला असतो. पोलिसांच्या पाहणीत हा प्रकार आल्यामुळे प्रयोगिक तत्त्वावर येथे बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. यामुळे त्रिमूर्ती चौकाकडून येणाऱ्या वाहनचालकांना सेव्हन हिल उड्डाणपुलाकडे जायचे असल्यास त्यांना आधी मोंढा नाका उड्डाणपुलाखालून वळसा घेऊन यावे लागणार आहे. तसेच स्मशान मारुती रस्त्याकडून आलेल्या वाहनचालकांना जर त्रिमूर्ती चौकाकडे जायचे असेल, तर त्यांना सेव्हन हिल उड्डाणपुलाखालून वळसा घेऊन यावे लागणार आहे. तसेच जालना रोडवरून धावणाऱ्या एखाद्या वाहनचालकाला यू टर्न घ्यायचा असला तरी त्यांना सेव्हन हिल उड्डाणपूल आणि मोंढा नाका उड्डाणपुलाखाली जावे लागणार आहे.
आकाशवाणी ‘चौक’ बंद
By admin | Updated: May 6, 2016 23:59 IST