आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0९ : अहमदनगरहून कोल्हापूरात पैलवान बनण्यासाठी आलेल्या सात वर्षाच्या शाळकरी मुलास दोघा भावांनी अमानुष छळ करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सार्थक नवनाथ गोरे (रा. मिरजगाव, नगर, जि. अहमदनगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. गरम गॅसवर बसविणे, गुप्तांगावर गरम पाणी ओतणे, डोळ्यावर, छातीवर, पोटावर बेदम मारहाण करणे असे विचित्र प्रयोग त्यांनी केले आहेत. संशयित सूरज (वय १७) व धिरज बारसकर (११ रा. वालवड, ता. भूम, जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही सार्थकचे मित्र आहेत.
अधिक माहिती अशी, सार्थक गोरे याच्या वडीलांचे मूळ गाव चिंचपूरडगे (ता. भूम, जि. उस्मानाबाद) हे आहे. मिरजगाव येथे वेल्डींगचे वर्कशॉप असल्याने ते कुटुंबासह याठिकाणी राहतात. त्यांच्या मूळ गावा शेजारी राहणारे सूरज व धिरज बारसकर हे दोघे भाऊ कोल्हापूरात न्यू मोतीबाग तालमीत मल्ल प्रशिक्षण घेतात. सार्थकचे चुलते जालिंदर दत्तात्रय गोरे हे चिंचपुरडगे याठिकाणी राहतात. त्यांनी सार्थकला दीड महिन्यापूर्वी पैलवान बनण्यासाठी या दोघा भावासोंबत कोल्हापूरला पाठविले. तालमीशेजारील दगडी चाळ येथे तिघेजण खोली घेवून राहत होते.
सार्थक दोन-चार वेळाच तालमीत गेला. त्यानंतर तो गेलाच नाही. या दोघा भावांनी त्याला भांडी घासायला लावणे, झाडलोट करणे अशी कामे लावली. प्रसंगी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केला. त्याला विरोध केल्यास बेदम मारहाण करीत असत. गरम गॅसवर बसविणे, गुप्तांगावर गरम पाणी ओतणे असे विचित्र प्रयोग त्यांनी त्याच्यावर केले. त्याच्या आई-वडीलांचे फोनही त्याला दिले जात नव्हते. बंद खोलीत डांबून त्याच्यावर महिनाभर अत्याचार सुरु होता. त्याची प्रकृती जास्तच गंभीर झाल्यानंतर या दोघा भावांनी त्याला मंगळवार (दि. ६) रोजी सीपीआरमध्ये दाखल केले. त्याच्या आई-वडीलांना याची कल्पनाही दिली नाही.
हा प्रकार गंभीर असल्याने सीपीआरच्या डॉक्टरांनी सार्थकला धिर देत आई-वडीलांचा फोन नंबर मिळविला. त्यांच्याशी संपर्क साधून तत्काळ कोल्हापूरला येण्यास सांगितले. गुरुवारी आई-वडीलांनी सीपीआरमध्ये येवून मुलाची प्रकृती पाहली असता मानसिक धक्काच बसला आहे. सार्थकवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याचे आई-वडील या मानसिक धक्यातून सावरले नसल्याने त्यांनी याप्रकरणी पोलीसांत तक्रार दिलेली नाही.
ठार मारण्याची धमकी
सार्थकवर गेल्या महिनाभरापासून अत्याचार होत होता. या काळात त्याच्या आईचे फोन त्याला येत होते. या दोघा भावांनी आई-वडीलांना सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने तो भितीने मी चांगला आहे, असे सांगत असे. त्यामुळे आई-वडीलांना तो कोल्हापूरात रुळलाय असेच वाटले होते. बुधवार (दि. ७) रोजी त्याला घरी घेवून जाण्यासाठी आई-वडील येणार होते. परंतु या दोघा भावांनी त्यांना सार्थक अजून आठ दिवस याठिकाणीच थांबणार आहे. तुम्ही येवू नका म्हणून निरोप दिला होता. गुरुवारी आई-वडीलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी सार्थक व्यायाम करीत नव्हता. त्यामुळे मारहाण केल्याचे सांगत पोलिसात तक्रार करु नका म्हणून हात जोडून विनंती केली. त्यानंतर ते दोघेही गावी निघून गेले.