औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत असलेल्या कृषीविज्ञान केंद्राद्वारे कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला सुरुवात झाली आहे. यामध्ये रविवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त महिला शेतकरी मेळावा घेण्यात आला. यात महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवसरकर आदींनी या महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर केव्हीकेच्या शास्त्रज्ञांनी महिलांना कृषीपूरक व्यवसाय, महिला बचत गट, गृहउद्योग व शेतीतील विविध तंत्रज्ञान यासंदर्भात शिवारफेरी काढून माहिती दिली.
नानेगाव (ता. पैठण) येथे कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पैठण तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी ऊस पीक लागवड तंत्रज्ञान, मोसंबी पिकाचे लागवड तंत्रज्ञान व सद्यस्थितीतील विविध पिकांमध्ये कीड व रोग नियंत्रण यासंदर्भात मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या विषयतज्ज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर यांनी दूध व्यवसाय हा प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा आणि त्यातून आपला आर्थिक नफा मोठ्या प्रमाणावर वाढवावा, असे आवाहन केले. कृषी अभियांत्रिकीच्या प्रा. गीता, विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे यांनी विविध योजनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक प्रदीप शिंदे, शिवा काजळे व आदींनी सहकार्य केले.