प्रताप नलावडे , बीडआर टी ओ च्या कोणत्याही कामासाठी एजंट नसेल तर काडीही इकडची तिकडे होत नाही, असे चित्र सध्या बीडच्या कार्यालयात आहे तर अंबाजोगाईचे अख्खे आर टी ओ कार्यालयच एजंटांनी ‘हाय जॅक’ केले आहे. त्यामुळे अगदी किरकोळ काम करण्यासाठी सुध्दा एजंटाशिवाय पर्याय नसल्याचेच चित्र या दोन्ही कार्यालयात दिसत आहे. प्रादेशिक परिवहनची जिल्ह्यात दोन कार्यालये आहेत. बीड आणि अंबाजोगाई येथील दोन्ही कार्यालयात एजंटाशिवाय कोणतेच काम होत नाही. लर्निंग लायसेन्सपासून ते वाहनांच्या पासिंगपर्यंतची सर्व कामे या एजंटामार्फत केली जातात. हे एजंट कोणत्याही कामासाठी अव्वाच्या सव्वा दर उकळत असल्याच्या तक्रारी अनेकदा झाल्या आहेत. परंतु एजंटांचा या कार्यालयाला असलेला विळखा काही सुटलेला नाही. शासकीय शुल्कापेक्षा खूप मोठी रक्कम सामान्यांकडून वसूल केली जाते. प्रत्यक्षात अगदी लर्निंग लायसेन्स काढण्यासाठी नेमके किती शुल्क आकारले जाते, याची माहिती बहुतेकांना नसते. त्यामुळे मग समोरचा व्यक्ती पाहून एजंट यासाठीचे दर ठरवितात.एका एजंटानेच दिलेल्या माहितीनुसार लर्निंग लासेन्स काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शुल्क हे केवळ ४० रूपये इतके आहे. परंतु यासाठी एजंट ४५० रूपयांची आकारणी करतात. पक्के लासेन्स काढण्यासाठीचे शुल्क हे केवळ ३५० रूपये इतके आहे. परंतु त्यासाठी एजंट एक हजार रुपयांपर्यंतची आकारणी करतात. नवीन वाहनांचे पासिंग करण्याचे काम असो की वाहनांचे हस्तांतरण असो, कोणत्याही कामासाठी शुल्कापेक्षा खूप मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने ‘लक्ष्मी’ चा लाभ जसा एजंटांना होतो, तसाच अधिकाऱ्यांनाही होतो.सामान्यांकडून आकारण्यात येणाऱ्या जादा रक्कमेतील मोठा वाटा अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिला जातो. अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ही साखळी कार्यरत असते. ज्या एजंटांकडे मोठी उलाढाल असते, त्यांना मंथली बेसवर रक्कम द्यावी लागते.बीडच्या आर टी ओ कार्यालयात ५० एजंट असून अंबाजोगाईच्या कार्यालयात ८५ एजंट आहेत. या एजंटांच्या हाताखाली किमान दोनजण काम करीत असतात. याशिवाय प्रत्येक तालुक्याला आर टी ओ ची कामे करणारे एजंट कार्यरत आहेत. लर्निंग लासेन्सपासून वाहनाच्या संदर्भाने कोणतेही काम करायचे असेल तर यांच्या मार्फतच हे काम होते. त्यांच्याशिवाय कोणी स्वत: काम करायचा प्रयत्न केलाच तर आर टी ओ कार्यालयात त्याला दाद लागू दिली जात नाही.एजंटाचा बळीअंबाजोगाईचा अशोक विष्णुपंत हत्ते हा आर टी ओ चा एजंट म्हणून काम करीत होता. फेब्रुवारी महिन्यात त्याने आपल्या पत्नी आणि छोट्या मुलीसह आत्महत्या केली. त्याची पत्नी शिक्षिका होती. या सामुहिक आत्महत्येनंतर आर टी ओ कार्यालयातील आर्थिक वादातूनच ही आत्महत्या केली असल्याची चर्चा होत राहिली. कुटुंबच संपल्याने यात नेमके काय झाले आणि नेमका व्यवहार काय होता, हे आजही रहस्यच बनून राहिले आहे. अंबाजोगाईचा कारभार एजंट भरोसेबीड जिल्ह्याचा विस्तार पाहता २००४ मध्ये अंबाजोगाईला आर टी ओ कार्यालयाची सुरूवात झाली. परंतु हे कार्यालय सुरू झाल्यापासून आजतागायत असा अधिकारीच या कार्यालयाला लाभला नाही की जो अंबाजोगाईत एखादा दिवस तरी मुक्कामासाठी थांबला आहे. जे अधिकारी आले त्यांनी लातूरला राहणेच पसंत केले. त्यामुळे या कार्यालयाचा ताबाच एजंटांनी घेतला आहे. या कार्यालयात आजही निम्म्या अधिकाऱ्यांच्या जागा रिक्तच आहेत.
आर्थिक वादातूनच एजंटांचे लक्ष्मीदर्शन
By admin | Updated: August 21, 2014 01:23 IST