वैजापूर : वैजापूरसह जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांवर तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर साखर उपलब्ध झाली असून, ही साखर दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना दिली जाणार आहे. जिल्ह्यासाठी ५ हजार ८१३ क्विंटल साखर मिळाली आहे. शासनाच्या हलगर्जीपणाच्या धोरणाचा फटका सर्वसामान्यांना बसल्याने त्यांना खुल्या बाजारातील साखर चढ्या भावाने विकत घ्यावी लागत होती. त्यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. शासनाने आचारसंहिता लागू होण्याअगोदर सर्वसामान्यांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न केला.दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना १३ रुपये ५० पैसे किलो दराने ही साखर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तालुक्यातील १ लाख ७ हजार २९७ बीपीएल, तर २३ हजार ४६७ अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना दरडोई ५०० ग्रॅमप्रमाणे प्रौढ अथवा मूल असा भेदभाव न करता ही साखर दिली जाईल. साखर कारखान्यांबाबतचे लेव्हीचे धोरण केंद्र शासनाने बदलल्यानंतर खाजगी साखर कारखान्यांकडून पुरवठा विभागाला साखर उपलब्ध करून दिली जात नव्हती. केंद्र शासनाने साखर कारखान्यांच्या नावे नियतन काढले; मात्र कारखानदारांनी २८ रुपये प्रतिकिलो दराने साखर देण्यास नकार दिला. नोव्हेंबर २०१३ मध्ये राज्य शासनानेही साखरेसाठी निविदा प्रक्रिया राबविली; मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. या सर्व अडचणींमुळे गेल्या वर्षापासून राज्यात स्वस्त धान्य दुकानातून साखर गायब झाली होती. परिणामी बीपीएल आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना साखर उपलब्ध होत नव्हती.जिल्ह्यासाठी ५ हजार ८१३ क्विंटल साखरराज्यातील पुरवठादार साखर कारखाने शासनाला आणि साखर संघालाही जुमानत नसल्याने शासनाने साखर नॉमिनीऐवजी एनसीडीइएक्स स्पॉट एक्स्चेंज लि. यांच्यामार्फत गौतम साखर कारखाना, कोल्हापूर या खाजगी पुरवठादारांकडून उपलब्ध करून घेतली आहे. जिल्ह्यासाठी ५ हजार ८१३ क्विंटल साखर उपलब्ध झाली आहे. यात वैजापूर तालुक्याला ५७२ क्विंटल, पैठण- ६००, गंगापूर-५७७, खुलताबाद-७०, कन्नड-७८२, सिल्लोड- ६१०, सोयगाव- ७०, फुलंब्री- २५२, औरंगाबाद- २८० तर औरंगाबाद शहरासाठी २ हजार क्विंटल साखर मिळाली असून, ही साखर पुरवठादाराकडून तालुकास्तरावर शासकीय गोदामात पोहोचविण्यात आली आहे. नॉमिनींना वगळून थेट शासकीय गोदामांवर ही साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गहू, तांदळासारखे रेशन दुकानदारांना शासकीय गोदामातून साखर उपलब्ध करून देण्यात येईल. वैजापूर तालुक्यासाठी ५७२ क्विंटल साखर उपलब्ध झाली असून, येत्या दोन दिवसांत तिचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार अभय बेलसरे यांनी दिली.