तामलवाडी : वादळी वार्यासह झालेल्या पावसात तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा शिवारातील विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते. परंतु, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अनेक ठिकाणचे खांब उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या परिसरातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला नाही. तामलवाडीसह परिसरात मागील दोन महिन्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. या पावसाने पिकांसोबतच वीज कंपनीचेही मोठे नुकसान झाले होते. विजेचे २५० खांब आणि ट्रान्सफार्मर जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, अद्याप वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. सांगवी मार्डी ते काटी जाणार्या वीज वाहिनीच्या जोडणीसाठी उभारण्यात आलेले खांबही वादळी वार्यात कोसळले आहेत. मात्र, वीज कंपनीकडे कर्मचार्यांची कमतरता असल्या कारणाने ही कामे तातडीने होत नसल्याचे समजते. या प्रकरामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्युतपंप बंद असल्यामुळे उसासोबतच अन्य पिकेही अडचणीत आली आहेत. (वार्ताहर)सांगवी काटीसाठी नेमण्यात आलेले वीज कर्मचारी गावात राहात नाहीत. त्यामुळे काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास शेतकर्यांना किरकोळ कामे खाजगी व्यक्तींकडून करून घ्यावी लागतात. त्याचा आर्थिक भुर्दंडही शेतकर्यांनाच सोसावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.ट्रान्सफार्मर जोडण्यात आलेल्या खांबावर बसविण्यात आलेल्या डीपींचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. दारे खिळखिळी झाली असल्याने ती सताड उघडी असतात. त्यामुळे अशा डीपींपासून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याकडे वीज कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दोन महिन्यांनंतरही खांब आडवेच
By admin | Updated: May 25, 2014 01:06 IST