वाळूज महानगर : ‘पिंपरखेडा जि. प. शाळेतील ८ वर्गांची जबाबदारी केवळ ३ शिक्षकांवर’ या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करताच शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. या वृत्ताची दखल घेऊन आज गुरुवार, दि. ७ आॅगस्ट रोजी केंद्रप्रमुखांनी शाळेला भेट देऊन तात्काळ मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांची नेमणूक केली आहे. अखेर शाळेला शिक्षक मिळाल्याने शालेय समिती व पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.वाळूज औद्योगिक वसाहतीपासून सुमारे ८-१० कि़ मी. अंतरावर असलेल्या पिंपरखेडा गावातील जिल्हा परिषद शाळेत १ ली ते ७ वीपर्यंतचे वर्ग आहेत. शासन निर्णयानुसार यावर्षी इयत्ता ८ वीचा नवीन वर्ग सुरू करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शाळेला शिक्षक मिळत नव्हते. त्यामुळे या ८ वर्गांतील १६९ विद्यार्थ्यांचा भार केवळ तीनच शिक्षकांच्या खांद्यावर होता.शाळेवर तात्काळ शिक्षकांची नेमणूक करावी, अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय शालेय समितीच्या अध्यक्षा शोभा शिंदे, उपाध्यक्षा रूमशाद अय्युब शेख, सदस्य अॅड. अनंत पा. खवले, सुरेश कदम आदींनी घेतला होता. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच तात्काळ दखल घेऊन आज केंद्रप्रमुख देवीदास सूर्यवंशी यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या मुख्याध्यापकपदी चिंचोलकर, तर सहशिक्षक म्हणून जी. सी. काथार, कापडणीस, पुजारी, मुर्तडक व पदवीधर शिक्षकपदी एकाची नेमणूक केली आहे. केंद्रप्रमुखाच्या या निर्णयाचे शालेय समिती सदस्य रेवणनाथ शिंदे, विजय पवार, संजय खजिनदार, राम चनघटे, पुंजाराम चनघटे, गणेश गायकवाड, कस्तुराबाई कार्वेकर व पालक प्रतिनिधी बाबासाहेब शिंदे, प्रवीण चनघटे, गितेश शिंदे, सचिन शिंदे, बाळासाहेब चनघटे, अॅड. अनिल इंगळे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला व लोकमतचे विशेष आभार मानले. यासंदर्भात केंद्रप्रमुख देवीदास सूर्यवंशी म्हणाले की, पिंपरखेडा जिल्हा परिषद शाळेवर ५ शिक्षकांची पदे मंजूर आहेत.शाळेला कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांच्या हिताकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते. तीन-तीन वर्ग एकत्र बसवून शिक्षक शिकवीत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
अखेर पिंपरखेडा जिल्हा परिषद शाळेला मिळाले शिक्षक
By admin | Updated: August 8, 2014 01:24 IST