संजय कुलकर्णी , जालना अंबड तालुक्यातील आपेगाव येथील ‘मिनरल वॉटर’ योजना कमी वीजदाबामुळे बंद पडली आहे. योजना सुरू होऊन अवघ्या काही महिन्यांतच ही योजना बंद पडल्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. शहागड - पैठण रोडवर साष्टपिंपळगाव नजीक असलेले आपेगाव हे विज्ञानेश्वर या नावाने असलेल्या महादेवाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. गावात २०० कुटुंबांची वस्ती. गावातील सर्वच विहिरींचे पाणी दूषित असल्याने ग्रामस्थांना तेच पाणी प्यावे लागत होते. परिणामी जलजन्य आजार मोठ्या प्रमाणावर पसरत होते. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत २०१२-१३ च्या टंचाई कृती आराखड्याअंतर्गत गावाची नळयोजनेसाठी निवड झाली. तत्कालीन सहायक वैज्ञानिक यांनी आपल्या अहवालात या गावासाठी पाण्याचा उद्भव ७ कि़मी. अंतरावरील दह्याळा शिवारात दर्शविला. सदर योजनेसाठी अपेक्षित ४९ लाखांचा खर्च नियमांच्या चौकटीत बसत नव्हता. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन् यांना ही बाब लक्षात आली. २३ मे २०१२ रोजी त्यांनी गावात जाऊन ग्रामसभा घेतली व नवीन उद्भव घेण्यापेक्षा गावात जलशुद्धीकरण सयंत्र बसविल्यास पिण्याचे शुद्ध पाणी (मिनरल वॉटर) मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामसभेनेही या योजनेसाठी एकमताने संमती दर्शविली. वॉटर लाईफ इंडिया प्रा.लि. सिकंदराबाद या एजन्सीमार्फत प्रायोगिक तत्त्वावर गुणवत्ता बाधित आपेगावात जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्याची योजना करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी १६ लाख २१ हजार ७६५ रुपयांचा खर्चही करण्यात आला. जानेवारी २०१३ पासून ही योजना गावात सुरू झाली खरी. ्रगावातील कुटुंबियांना प्रतिव्यक्ती याप्रमाणे जेवढे पाणी लागेल, त्यांनी ते योजनेच्या ठिकाणावरून घेऊन जायचे. ३ रुपयांमध्ये २० लिटर पाणी याप्रमाणे ‘मिनरल वॉटर’ चे दर ठरविण्यात आले. योजनेसाठी लागणार्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतने करायची. तर १० वर्षांसाठी देखभाल दुरूस्ती सदर एजन्सीने करावी, असे यासंबंधी झालेल्या कराराद्वारे ठरविण्यात आले. लोकांना पाणी मिळाले. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. मात्र वीजदाब कमी असल्याने गावात प्रत्येक घरातील वीजपुरवठा बंद ठेवल्यानंतरच पाणी मिळू लागल्याने ही योजना अडचणीत सापडली. गेल्या एक वर्षांपासून कमी वीजदाबामुळे ही योजना बंद आहे. योग्य वीजदाब आवश्यक सरपंच गजेंद्र चौधरी म्हणाले की, गावात वीजदाब कमी असल्याने वीजपुरवठा सुरळीत राहत नाही. सदर योजनेसाठी लागणारा वीजपुरवठा उच्च दाबाचा असणे आवश्यक आहे. ही योजना बंद असल्याने ग्रामस्थांना नळयोजनेचे पाणी पिण्यासाठी मिळते, असे चौधरी यांनी सांगितले. ‘पेयजल’ मधूनच रोहित्र बसवा सदर योजनेसाठी नवीन रोहित्र ‘राष्ट्रीय पेयजल’ अंतर्गत तातडीने बसवावे, असे जि.प. सदस्य अॅड. संजय काळबांडे यांनी म्हटले आहे. आपेगाव येथे विज्ञानेश्वराच्या दर्शनासाठी दूर दूरून भाविक येत असल्याने बंद पडलेली ही योजना तात्काळ सुरू करावी, अशी मागणी काळबांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे केली. स्वतंत्र रोहित्रासाठी प्रयत्न सदर योजनेला योग्य क्षमतेचा वीजदाब मिळावा, यासाठी महावितरणच्या सहाय्याने गावात स्वतंत्र रोहित्र बसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ग्रा.पा.पु. योजनेचे कार्यकारी अभियंता एस.एम. कदम यांनी सांगितले. तर महावितरणकडे यासंदर्भातील पत्र देण्यात आले असून पाठपुरावा सुरू असल्याचे शाखा अभियंता स्वामी यांनी सांगितले.
आपेगावची ‘मिनरल वॉटर’ योजना थंड बस्त्यात !
By admin | Updated: May 29, 2014 00:40 IST