संतोष हिरेमठ , औरंगाबाददुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे राज्यातील गावागावांमधील लोकांचे जीवन अवघड झाले आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांची पायपीट सुरू आहे. घोटभर पाण्यासाठी अनेकांचे हाल होत असताना शहरातील अनेक भागांमध्ये मात्र टंचाईची जाणीव असतानाही नागरिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी जनजागृती करण्याबरोबर पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात नागरिकांनी व्यक्त केले.औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीपातळीही खोल गेली आहे. शिवाय राज्यात सर्वत्र पाण्याचे भीषण संकट आहे. अशा पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून आवाहन आणि जनजागृती केली जाते. अनेकांनी पाणी बचतीसाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे; परंतु तरीही या ना त्या पद्धतीने अनेकांकडून पाण्याची नासाडी सुरूच असल्याचे चित्र शहरातील विविध भागांत पाहावयास मिळते. पाण्याची भीषण पाणीटंचाई असतानाही पाणीपुरवठ्याच्या वेळेत पिण्यासाठी आलेल्या पाण्याने वाहने, घर, अंगण, ओटे धुऊन पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेच्या दक्षता पथकाक डून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे; परंतु प्रत्यक्षात महापालिकेकडून होणारी कारवाई पुरेशी ठरत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक गाव, शहरांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ लोकांवर येत आहे. कामकाज सोडून महिला, पुरुष आणि चिमुकल्यांना पाण्याची वाट पाहण्याची वेळ येत आहे; परंतु औरंगाबादेत सध्या अनेक भागांमध्ये या उलट परिस्थिती पाहावयास मिळते. शहरातदेखील काही भागांमधील नागरिकांना पाण्यासाठी गैरसोय सहन करावी लागत आहे; परंतु या सगळ्याची जाणीव असतानाही अनेकांकडून पाण्याचा योग्य वापर होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत पाणी बचतीविषयी शहरवासीयांची भूमिका आणि पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाईची गरज असून, याविषयी सर्वेक्षण करण्यात आले.
जनजागृतीसह पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई गरजेची
By admin | Updated: April 16, 2016 01:51 IST