जळकोट : तालुक्यातील नगारिकांना पाणीटंचाई, जनावरांना चाराटंचाई भासू नये म्हणून प्रशासनाने तत्पर राहून काम करावे़ यासंदर्भात कुठलीही तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले़ येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीत त्या बोलत होत्या़ यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम पटवारी, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे, प्रकल्प संचालक एस़जी़ पाटील, कार्यकारी अभियंता शेलार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ लक्ष्मण पवार, जि़प़सदस्य चंदन पाटील, शांताबाई अदावळे, पंचायत समिती सभापती वनमाला फुलारी, उपसभापती भरत मालुसरे, सदस्य सोंदरबाई सूर्यवंशी, कमलाबाई माने, गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड, विस्तार अधिकारी एस़डी़ फड, उपविभागीय अधिकारी जी़बी़ नरवटे, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत कापसे, पशुसंवर्धन तालुका अधिकारी डॉ़पी़एऩ धोड, पं़स़सदस्य गवळे आदी उपस्थित होते़ यावेळी विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले़ पुढे प्रतिभाताई कव्हेकर म्हणाल्या, मजुरांना गावातच काम उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामसेवकांनी कामांची मागणी करावी, त्याचबरोबर चारा-छावण्याबाबत मागणी आल्यास सर्वे करून छावण्या उभ्या करण्यात याव्यात, असेही त्या म्हणाल्या़ यावेळी चंदन पाटील यांनी अनेक शेतकऱ्यांकडे एक लाख रूपयांच्या बैलजोड्या आहेत़ हे शेतकरी आपले बैल चारा छावण्यात सोडत नाही़ त्यामुळे अशा जनावरांसाठी घरपोच मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करावी, अशी मागणी केली़ प्रस्ताविक एच़आऱराठोड यांनी केले़ आभार एस़डी़ फड यांनी केले़ यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते़(वार्ताहर) यावेळी प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कामाचा आढावा घेतला़ तालुक्यातील १३ गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने विहिरी अधिग्रहण व टँकर्सची मागणी पंचायत समितीकडे केली आहे़ तहसील कार्यालयात एक महिन्यापूर्वी प्रस्ताव दाखल झाले असून, अद्यापही त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे सरपंच, ग्रामसेवकांनी सांगितले़
तक्रार आल्यास कारवाई !
By admin | Updated: March 19, 2015 23:55 IST