गेल्या दीड वर्षात ९,७४७ गर्भपातांची नोंद : असुरक्षित गर्भपातामुळे वाढली जिवाची रिस्क
----
योगेश पायघन
औरंगाबाद : शहरातील विवाहितेने सिडको परिसरात साडेचार महिन्यांचा गर्भपात केला. अप्रशिक्षित व्यक्तीने केलेल्या चुकीच्या गर्भपातामुळे त्या महिलेची गर्भपिशवी काढावी लागली, तसेच गुंतागुंत वाढल्याने महिला अजूनही गंभीर असून घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाकाळात गर्भपाताच्या घटना घटल्या असल्या तरी शहरात अद्यापही असुरक्षित गर्भपात होत असून, ग्रामीण भागातील परिस्थिती यापेक्षा विदारक असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गर्भवती मातेच्या जिवाला धोका, गर्भवतीला मानसिक किंवा शारीरिक आरोग्यास गंभीर इजा, दुखापत, नवजात बालकास जन्मानंतर मानसिक किंवा शारीरिक व्यंग असल्यास त्यामुळे बालकास अपंगत्वाची शक्यता, महिलेच्या मानसिक आरोग्याला जबर धक्का बसल्याचे गृहीत धरून महिलेला, कुमारिकेला बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असेल, तसेच विवाहित महिलेकडून किंवा तिच्या पतीकडून गर्भनिरोधक साहित्याच्या निष्क्रियतेमुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपात करता येतो. त्यासाठी जिल्हास्तरीय गर्भपाताच्या समितीच्या मान्यतेनुसार ८, १२ ते २० आठवड्यांपर्यंत गर्भपाताची ठिकाणे शासकीय व खाजगी रुग्णालये निर्धारित केलेली आहेत. जिल्हा रुग्णालयात दीड वर्षापासून कोरोना रुग्णांचे उपचार सुरू आहेत, तर घाटी रुग्णालयात महिन्याकाठी ४० ते ६० सुरक्षित गर्भपात केले जातात. जिल्हाभरात अधिकृत गर्भपात केंद्र असताना अवैधरीत्या असुरक्षित गर्भपाताची प्रकरणे घडण्यातून महिलांची जोखीम वाढते. अनेक प्रकरणात असुरक्षित गर्भपातामुळे महिलांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञ, अनुभवी मान्यताप्राप्त डाॅक्टरांकडूनच गर्भपात करण्याचा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञ देतात.
---
जिल्ह्यातील गर्भपात
---
१२ आठवड्यांपर्यंत
२०१९ -७८२९
२०२० -६००५
२०२१ (३० जूनपर्यंत) -३०८०
---
१२ ते २० आठवड्यापर्यंत
२०१९ -५७४
२०२० -३७०
२०२१ (३० जूनपर्यंत) -२९२
-----
२० आठवड्यांपर्यंत एकूण गर्भपात
२०१९ -८४०३
२०२० -६३७५
२०२१ (३० जूनपर्यंत) -३३७२
----
गर्भपाताची कारणे काय?
---
पहिल्या १२ आठवड्यांत, तसेच पुढील २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येतो. गुणसूत्राची जडणघडण चुकीची होणे हे आनुवंशिक असते. त्याला घाबरण्याची गरज नाही. मात्र, गर्भात व्यंग असणे, मधुमेह, गुणसूत्र आनुवंशिक खराब असणे, हार्मोनल इम्बॅलेन्स, जास्त गर्भ राहिले, गर्भपिशवीचे आजार अशा वेळी गर्भपात होऊ शकतो.
---
गर्भ पोटात असताना कोरोना झाला तर...
--
पोटात गर्भ असताना कोरोना झाल्यास बहुतांशवेळी ८० टक्के गर्भवतींना लक्षणे साैम्य असतात. ज्यांना लक्षणे जास्त आहेत त्यांना स्त्रीरोग तज्ज्ञांकडून उपचार दिले जातात. त्यासाठी गर्भपाताची आवश्यकता नाही. ताप येऊ नये, हातांची स्वच्छता, गरज पडल्यास भरती होण्याचे सांगितल्यास रुग्णालयात भरती होऊन उपचार घ्यावेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा गर्भावर परिणाम होत नाही.
--
सध्या ग्रामीणमधील शासकीय रुग्णालये बहुतांश कोरोना उपचारात गुंतल्याने तिथे गर्भपाताची सुविधा मिळाली नाही. शहरातही काहीअंशी तशीच परिस्थिती होती. त्यामुळे गर्भपात करता न आल्याने गर्भधारणा राहिली. आता उशिरा गर्भपात केल्याने त्या गर्भवतींची जोखीम वाढून अतिरक्तस्रावाच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन असुरक्षित गर्भपात टाळावा.
-डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूती विभाग प्रमुख, घाटी रुग्णालय, औरंगाबाद