परभणी : स्थानिक संस्था कर रद्द झाल्यानंतर परभणी शहरात मनपाने अभय योजनेची अंमलबजावणी सुरू केली़ त्यानुसार मागील दोन महिन्यांत ९९१ व्यापाऱ्यांनी अभय योजनेत सहभाग नोंदविल्याची माहिती मनपाच्या एलबीटी विभागाकडून मिळाली़ या नोंदणीतून मनपाला २ कोटी ९९ लाख ८३ हजार रुपये मिळाले आहेत़ स्थानिक संस्था कराच्या ऐवजी अभय योजना मनपात लागू करण्यात आली़ व्यापाऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे़ एलबीटीमध्ये ३ हजार २०० व्यापाऱ्यांची नोंद मनपात होती़ यातील ९९१ व्यापाऱ्यांनी अभय योजनेत सहभाग नोंदविला आहे़ या व्यापाऱ्यांचे विवरण पत्र दाखल करून घेण्याची प्रक्रिया मनपाकडून राबविण्यात आली़ व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची उलाढाल किती झाली़ याबाबत मनपाकडून माहिती घेतली जात आहे़ योजनेत सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे या विभागाने मागविली़ त्यानुसार काही व्यापाऱ्यांनी त्यांचे कागदपत्र जमा केले आहेत़ या माध्यमातून व्यापाऱ्यांकडून मनपाला आर्थिक स्त्रोत मिळण्यास मदत होणार आहे़ मागील चार वर्षांचे व्यापाऱ्यांचे कर निर्धारण या विभागाकडून तपासण्यात येत आहेत़ त्यांच्या कागदपत्राच्या आधारे कर निर्धारण तपासून येत्या ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे़ मनपाच्या पथकाकडून व्यापाऱ्यांचे वितरण पत्र घेऊन त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे़ या व्यतिरिक्त कागदपत्र न देणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़ (प्रतिनिधी)
अभय योजनेत ९९१ व्यापाऱ्यांची नोंदणी
By admin | Updated: January 14, 2016 23:25 IST