बीड : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. १६ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघासाठी एक अशा प्रकारे सहा विभागात मोजणीचे काम होणार आहे. प्रत्येक विभागात १६ टेबल राहणार आहेत. एकूण ९६ टेबलवर मोजणी होणार आहे. दरम्यान, निकालाच्या अनुषंगाने मोठा फौजफाटा तैनात राहणार आहे. २६ फेर्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल. १७ एप्रिल रोजी बीड लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन सीलबंद करून शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरक्षितरीत्या ठेवले होते. दरम्यान, बीडच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेले आहे. १६ मे रोजी मतदारांची उत्कंठा संपणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होईल. तत्पूर्वी इव्हीएम मशीन सुरक्षितरीत्या बाहेर काढून प्रशस्त जागेवर ठेवण्यात येतील. त्या- त्या मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्यांच्या तसेच उमेदवार व पोलिंग एजंटच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी केंद्रातील हॉलचे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक अशा प्रकारे सहा विभागात विभाजन करण्यात येईल. प्रत्येक विभागात १६ टेबल म्हणजे एकूण ९६ टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, मदतनीस बसेल. उमेदवारांचे एजंट बॅरिकेटस्च्या पलीकडून कामकाज पाहू शकतील. निवडणूक अधिकार्यांचे सर्व टेबलवर लक्ष राहील. सर्व अधिकारी व निरीक्षक आपापल्या जागी स्थानापन्न झाल्यावर बटन दाबून मतांची बेरीज केली जाईल. त्यानंतर निकाल निवडणूक अधिकार्यांपर्यंत पोहोचविला जाईल. निवडणूक अधिकारी एका विशेष सॉफ्टवेअर मार्फत तो निकाल निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवितील. मतमोजणी केलेले मशीन्स टेबलवरून हलविण्यात येतील आणि मतमोजणीसाठी अन्य मशीन्स आणल्या जातील. एकूण २६ फेर्या होणार असून प्रत्येक फेरीच्या अखेरीस निवडणूक अधिकारी निकाल जाहीर करतील. सर्व तक्रारींची दखल घेऊन अंतिम बेरीज केली जाईल. त्यानंतर विजयी उमेदवार घोषित करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. (प्रतिनिधी) तगडा बंदोबस्त मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन इमारतीच्या बाहेर व आत तगडा बंदोबस्त राहील. वोटींग मशीन्सवर राज्य राखीव दलाचे जवान पहारा देतील. मतमोजणीत व्यत्यय येणार नाही यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. गोंधळ, गडबड करणार्यांवर नजर राहील, असे नियोजन केल्याचे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी म्हणाले.
९६ टेबलवर होणार मतमोजणी
By admin | Updated: May 15, 2014 00:03 IST